धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 22 एप्रिल : मुस्लिम धर्मियांचा पवित्र असा रमजान ईद हा सण आज 22 एप्रिल रोजी तर बासी ईद 23 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. मुस्लिम बांधव ईदच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. त्यामुळे मुंबईतील मोहम्मद अली रोड, हाजी अली, शिवाजी नगर, अंधेरी, जुहू चौपाटी, मालवणी, जोगेश्वरी माहीम, धारावी, अँटॉप हिल आदी भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता बेस्ट उपक्रमाने रमजान ईद निमित्ताने जादा बसगाड्यांची सुविधा उपलब्ध केली आहे.
किती बस सोडल्या जाणार?
तुमच्या शहरातून (मुंबई)
मुंबईमधील रमजान ईद आणि बासी ईदच्या निमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेऊन याही वर्षी मुस्लिम धर्मियांना मुंबईभर चांगला आणि सुखद प्रवास करता यावा म्हणून 27 बेस्ट डेपोमधून 165 जादा बस सोडण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. बेस्टकडून चालवण्यात येणाऱ्या जादा बसचा फायदा प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन बेस्टकडून करण्यात आले आहे.
नवनवीन योजना
बेस्ट उपक्रमाकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी एसी बसेस चालवण्यात येत आहेत. तसेच प्रवाशांना कमीत कमी खर्चात चांगला आणि सुखद प्रवास करता यावा म्हणून बेस्टने नवनवीन योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांमुळे प्रवाशांची संख्या वाढल्याचे बेस्टकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, बेस्टकडून मागील वर्षी गणेशोत्सव, नवरात्री, महापरिनिर्माण दिन, डॉ. आंबेडकर जयंती आदी प्रसंगी विशेष गाड्या सोडल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.