मुंबई, 6 एप्रिल : युवासेनेच्या सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांचं हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने बुधवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान निधन झालं. ठाण्यात काल महाविकास आघाडीच्या जनआक्रोश मोर्चात त्या सहभागी झाल्या होत्या. आज त्यांच्या अंत्यविधीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मुंबईत पेडर रोड परिसरात दाखल झाले. आपल्या जवळच्या सहकाऱ्याला गमावल्याने तिघेही भावुक झालेले पाहायला मिळाले.
ठाकरे कुटुंबाने दुर्गा भोसले यांच्या पेडर रोड येथील निवासस्थानी दाखल होत अंत्यदर्शन घेतलं. उद्धव ठाकरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पेडर रोड परिसरात दुर्गा यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झाले आहेत. ठाकरे कुटुंबाकडून दुर्गा यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यात आलं. यावेळी रश्मी ठाकरे यांना अश्रू अनावर झाले. दुर्गा भोसले यांच्या सारख्या पदाधिकाऱ्यांचं निधन ही पक्षाची मोठी वैयक्तिक हानी असल्याचं मत कार्यकर्त्यांकडून व्यक्त केलं जात आहे. अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत.
तुमच्या शहरातून (मुंबई)
वाचा – काल ठाण्याच्या मोर्चात सहभागी झाली, अन् आज गमावली युवासैनिक, आदित्य ठाकरे भावुक
शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्यानंतर काल ठाण्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा भव्य जनआक्रोश मोर्चा निघाला होता. या मोर्चात तीनही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. याच मोर्चात युवासेनेच्या सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण रात्री उशिरा दीड वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. दुर्गाताई भोसले शिंदे यांच्या पश्चात पती, आई, वडील केशवराव भोसले आणि भाऊ असा परिवार आहे.
आदित्य ठाकरेंची भावुक पोस्ट
‘काल आम्ही आमचा सर्वात मेहनती, उत्साही, दयाळू, संवेदनशील युवासैनिक गमावली. दुर्गा भोसले-शिंदे जी आपल्यात नाहीत, यावर विश्वास ठेवणे अतिशय कठीण आणि दुःखद आहे. एक युवासैनिक आणि मित्र म्हणून त्यांचे जाणे माझ्यासाठी शब्दांत व्यक्त करणे, शक्यच नाही. ॐ शांती!’ असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
अवघ्या तिसाव्या वर्षी घेतला जगाचा निरोप
युवा सेनेच्या सचिव दुर्गाताई भोसले या मुंबईच्या कंबाला हिल परिसरात राहतात. त्या अवघ्या 30 वर्षाच्या होत्या. इतक्या तरुण वयात मृत्यू झाल्याने शिवसैनिक हळहळ व्यक्त करत होत्या. त्या मोर्चासाठी काल ठाण्यात आल्या होत्या. घोषणा देत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. छातीत दुखू लागल्याने त्यांना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तातडीने विश्रांती घेण्यास सागितले. तसेच त्यांना तात्काळ उपचारासाठी मुंबईला पाठवले. दुर्गाताई यांना लगेचच बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचारही सुरू करण्यात आले. उपचार सुरू असतानाच काल रात्री 1.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.