प्रशांत बाग, प्रतिनिधी
मुंबई, 10 एप्रिल : मिरा भाईंदर शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामात आर्थिक घोटाळा झाला. यात किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांचा हात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याविरोधात डॉ. मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांवर मानहानी केल्याचा आरोप करून 100 कोटींचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी आज पार पडली. मात्र, कायम गंभीर स्वरुपात चालणाऱ्या कोर्टरुममध्ये आज चक्क हास्याचे फवारे पाहायला मिळाले. याला कारण ठरली डॉ. मेधा सोमय्या यांची कोर्टात अजब मागणी.
तुमच्या शहरातून (मुंबई)
शिवडी कोर्टात मूक संवाद
शिवडी कोर्टात आज याचिकाकर्ते आणि आरोपी मेधा सोमय्या आणि संजय राऊत यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध पाहायला मिळाले. दोघांच्या हास्यसंवाद झाला. संजय राऊत यांनी डॉ. मेधा सोमय्या यांना हसून नमस्कार केला. खुणेने आस्थेवाईकपणे विचारपूस केली. आपल्या जागेवरून उठून, मेधा सोमय्या यांनीही प्रतिसाद दिला. यावर संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, की मी मेधा सोमय्या यांना ओळखतो. त्यांचा आणि माझा अनेक वर्षांपासून परिचय आहे. त्यांना ओळख दाखवणं ही आपली संस्कृती आणि संस्कार आहेत. त्यांनी माझ्यावर केस दाखल केली असली तरी आपण संस्कार जपले पाहिजे.
सुनावणी दरम्यान कोर्टात हास्याची लकेर
सुनावणी सुरू असताना डॉ. मेधा सोमय्या यांची कोर्टात अजब मागणी. मी ऑफ द रेकॉर्ड काही बोलू का? इथे ऑफ द रेकॉर्ड काही नसतं, अवाक झालेल्या न्यायमूर्ती मोकाशी यांनी केलं स्पष्ट. तरी मेधा सोमय्या अत्यंत सहजतेनं म्हणाल्या. मला या वकिलांना (संजय राऊत यांच्या) जरा नीट समजावून सांगू द्या, म्हणजे ते प्रश्न नीट विचारतील. यावर कोर्टात हास्याचा अक्षरशः स्फोट झाला. डॉ. मेधा सोमय्या यांचा साधेपणा आणि सरळ स्वभाव दिसला.
वाचा – एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यानंतर घडामोडींना वेग, अमित शहा मुंबईत येणार
काय आहे हे शौचालय घोटाळा प्रकरण?
मिरा भाईंदर शहरात एकूण 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यातील 16 शौचालये बांधण्याच कंत्राट किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रे सादर करुन, मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केली. तसेच साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याची दखल घेत माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करुन, अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. त्यामुळे ज्या ठिकाणी शौचालय बांधण्यात आले आहे, त्या जागेची पाहणी वनविभागाने सुरु केली होती.
मेधा सोमय्या यांनी हा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी सामना वर्तमानपत्रातून केला होता. त्याविरोधात, डॉ. मेधा सोमय्या यांनी संजय राऊत याच्याविरोधात, मानहानी केल्याचा आरोप करून 100 कोटींचा दावा दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.