मुंबई, ता.२२ फेब्रुवारी
२६ फेब्रुवारी पासून मी आझाद मैदानावर #आमरणउपोषणास बसणार आहे, ते #नेमकेकशासाठी ? हे सर्वप्रथम सर्वांनी समजून घेणे गरजेचे आहे.
मराठा आरक्षण मिळवणे, हे आपल्या सर्वांचे प्रमुख उद्दिष्ट असले तरी, ती एक दीर्घकालीन न्यायालयीन प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ती पूर्ण होऊन आरक्षण मिळण्यास काही वर्षांचा कालावधी लागू शकतो. मात्र तोपर्यंतच्या काळात मराठा समाजाने काय करायचे ? आरक्षण नसल्यामुळे समाजाचे होणारे शैक्षणिक, सामाजिक व नोकऱ्यांमधील नुकसान व या अन्यायाची झळ कमी व्हावी, यासाठी आपण शासनाकडे काही प्रमुख मागण्या केल्या होत्या, १७ जून २०२१ रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत शासनाने या मागण्या मान्य देखील केल्या आहेत, मात्र आज आठ महिने उलटले तरी अजून त्यांची अंमलबावणी झालेली नाही. मराठा तरुण अजूनही अन्यायाच्या गर्तेतच सापडलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रमुख मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी व मराठा समाजाची आरक्षणावाचून होणारी होरपळ कमी करावी, याकरिता मी उपोषणास बसत आहे…..
तसेच, या मगण्यांबरोबरच मराठा आरक्षण मिळण्यासाठी न्या. भोसले समितीने केलेल्या शिफारशींची देखील अंमलबजाणी करण्यास तात्काळ सुरूवात करून लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी लागणारी प्रक्रिया सुरू करावी.