पुणे, 19 एप्रिल : मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील तापमानामध्ये कमालीची वाढ झाली आहे, त्यामुळे नागरिक उकाड्यापासून हैराण झाले आहेत. पण पुढच्या चार दिवसांमध्ये नागरिकांना दिलासा मिळणार आहे. संपूर्ण राज्यातील कमाल तापमानात उद्यापासून पुढचे 4 दिवस घट होणार आहे.
राज्यभरातलं तापमान पुढच्या चार दिवसांमध्ये कमी होईल, अशी माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉ.के.एस होसाळीकर यांनी दिली आहे.
मागच्या काही दिवसांमध्ये पुण्याचे तापमान 40 च्या वर जात आहे. पुण्यात एप्रिल-मे महिन्यात 40 अंश तापमानाची नोंद बऱ्याचदा झाली आहे. तापमान 40 अंशापेक्षा जास्त झाल्यावर नागरिकांनी काळजी घ्यावी. दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत गरज नसेल तर बाहेर पडू नये, असं आवाहनही हवामान विभागाने केलं आहे.
तुमच्या शहरातून (पुणे)
एकीकडे हवामान विभागाने राज्यातलं तापमान कमी होईल, असं सांगितलेलं असतानाच 15 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढचे दोन दिवस राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
राज्यात उन्हाचा पारा वाढत असल्याने दिवसा उन्हाचा तडाखा आणि संध्याकाळी वादळी पावसासह गारपीट होत असल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. याचबरोबर राज्यात वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे.
तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड या भागात पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.