रत्नागिरी, 6 मे : उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांनी बारसू प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. प्रकल्प बळजबरीनं नागरिकांवर लादू नका अन्यथा महाराष्ट्र पेटवू असा इशारा ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान दुसरीकडे ठाकरे यांच्या या दौऱ्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून देखील राजापूरमध्ये बारसूचं समर्थन करण्यासाठी रॅली काढण्यात आली. यावेळी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले राणे?
उद्धव ठाकरेंच्या बारसू भेटीवरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यातील सर्वात मोठा दलाल आज बारसूत आला आहे. उद्धव ठाकरेंना जन की बात नाही तर धन की बात कळते. महाराष्ट्र पेटवण्यापेक्षा लोकांच्या चुली पेटवा. मातोश्रीवर खोके पोहोचावेत यासाठीच बारसूला विरोध सुरू आहे. उद्धव ठाकरेंची भूमिका विकासविरोधी आहे. कोकणातील जनतेचा विकास त्यांना नको आहे, अशा शब्दांमध्ये नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
…तर महाराष्ट्र पेटवून टाकू; सोलगावमधून उद्धव ठाकरेंचा इशारा, ‘बारसू’चा वाद आणखी चिघळणार?
नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
आज उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सोलगावमधील नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर बोलताना ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्प नको, हुकूमशाही पद्धतीनं प्रकल्प लादू नका. मी इथ जन की बात ऐकण्यासाठी आलो आहे. मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही. रिफायनरीबाबत दिशाभूल सुरू आहे. कोकणातील जनता विकासविरोधी नाही. मात्र जर हुकूमशाही पद्धतीनं प्रकल्प लादणार असाल तर महाराष्ट्र पेटवून टाकू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी सरकारला दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.