पुणे, 23 एप्रिल : शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील राजकीय वाद काही शमण्याचं नाव घेताना दिसत नाही. शिवसेनेचे प्रवक्त दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. कुरमुड्या ज्योतिषांची संख्या वाढलेली आहे. संजय राऊत आणि यांच्या उपनेत्या सगळेच ज्योतिष सांगायला लागले आहेत. जर ज्योतिषावर राज्याचे भवितव्य ठरायला लागले तर मग महाराष्ट्र राज्य म्हणायला काय अर्थ आहे? असा प्रश्न उपस्थित करत राऊत आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना टोला लगावला आहे.
लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतात : दीपक केसरकर
तुमच्या शहरातून (पुणे)
महाविकास आघाडी आणि विशेषकरुन ठाकरे गटाकडून सतत सरकार पडणार असल्याचे दावे केले जात आहेत. यावर शिवसेना प्रवक्ते आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी टीका केली आहे. राज्यात कुरमुड्या ज्योतिषांची संख्या वाढली आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल यायला तेवढा तरी अवधी द्या. लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ते त्यांच्या पक्षाचं ऐकत नाही का? यामध्ये मला शंका वाटते. पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना समजून सांगण्याची गरज आहे, असंही केसरकर म्हणाले.
गुलाबराव पाटील यांना समज दिली जाईल : केसरकर
गुलाबराव पाटील असे बोलले असतील तर त्यांना निश्चितपणे समजून सांगण्यात येईल. ज्या पद्धतीने त्यांना चिडवले जाते शेवटी तोंडातून काहीतरी वदवून घ्यायचे आणि मग त्यांच्यावरच आरोप सुरू करायचे. समोरून आलेले वक्तव्य पण बघा. मुद्दामून चिडवले जाते आणि एखादे चुकीचे वाक्य आले तर त्याचं भांडवल करायचं. राजकीय बदनाम करायचं हे जे काही आदित्य ठाकरेंनी सुरू केले तो एक मोठ्या षड्यंत्राचा भाग आहे. महाराष्ट्राच्या जनतेने याच्यापासून सावध राहिले पाहिजे, असं स्पष्टीकर गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर केसरकर यांनी दिले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.