ऋचा कानोलकर, प्रतिनिधी
मुंबई, 3 एप्रिल : कोरोनाचा नवा व्हेरियंट XBB 1.16 महाराष्ट्रासाठी, विशेषत: मुंबईसाठी चिंतेची बाब ठरतोय. कारण आता कोविड रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्यानं वाढत आहे. बाधित रुग्णांना आता रुग्णालयात दाखल करावं लागत आहे. ही स्थिती पाहता मुंबई महापालिका प्रशासन खबरदारी घेतं आहे. मुंबईतल्या शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये असलेले कोविड वॉर्ड पुन्हा सक्रीय झाले आहेत.
तुमच्या शहरातून (मुंबई)
महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात 3641 नव्या रुग्णांची नोंद झालीय, महाराष्ट्रात आज 248 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत ज्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 3532 इतकी झालीय. तर मुंबईत आज कोरोनाच्या 75 नव्या रुग्णांची भर पडलीय. महाराष्ट्र राज्यात आज एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालाय.
मुंबई शहर एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता, आता वाढती रुग्णसंख्या पाहता पुन्हा ती स्थिती निर्माण होऊ नये याची मुंबई महापालिका खबरदारी घेतेय. शासकीय रुग्णालयांमध्ये असलेले कोविड वॉर्ड पुन्हा रुग्णांसाठी सज्ज झाले आहेत. सर्व रुग्णालयांना कोविड काळातील प्रोटोकॉल पुन्हा पाळण्याचे आदेश दिले गेलेत. संपूर्ण मुंबईत सध्या 1079 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत ज्यापैकी 94 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुंबई महापालिकेच्या सेंट जॉर्जेस रुग्णालयात 2 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, तर सेव्हन हिल्स रुग्णालयात एकूण 37 रुग्ण दाखल आहेत, ज्यापैकी कोविड वॉर्डमध्ये 19 रुग्ण, आयसीयूमध्ये 12 रुग्ण आणि प्रसूतीगृहात 3 गर्भवती तर 3 नवजात बालकं आहेत.
वाचा – हार्टअटॅक आणि कार्डियाक अरेस्ट वेगवेगळं की एकच?
गेल्या सात दिवसात कोरोनाबाधितांमध्ये झालेली वाढ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतरची सर्वाधिक वाढ आहे. मार्च महिन्यातील कोविड रुग्णांच्या मृत्यूचा आकडा हा नोव्हेंबर 2022 नंतरचा सर्वाधिक आकडा आहे. रुग्णालयांमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत असताना आरोग्य विभाग सतर्क झालाय, उपचारांच्या दृष्टीने वैद्यकीय उपकरणांची आणि बेड्सची संख्या वाढवली जातेय. कोविड वॉर्ड्समध्ये पूर्वीप्रमाणेच सर्व नियमांचं पालन केलं जातय, ऑक्सिजन बेड्स, ऑक्सिजन सिलेंडरसुद्धा पुरेसे उपलब्ध करून देण्यात येतायत. कोविडच्या संकटात काम केल्यानं आता येणाऱ्या संकटासाठी आम्ही संपूर्णपणे तयार आहोत असा कोविड हेल्थ स्टाफचा विश्वास आहे.
कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसले तरी गर्दीच्या ठिकाणी किंवा खोकला, सर्दीसारखी लक्षणं असल्यास मास्कचा जरूर वापरावा आणि शक्य तितकी स्वच्छता बाळगा हाच सल्ला डॉक्टर्स सध्या देत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.