जळगाव जिल्हा भाजप कार्यालयात घेण्यात आलेल्या हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानात हनुमान चालिसा पठण करण्यास मज्जाव करून खासदार नवनीतकौर राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. याचा निषेध करत भाजप महानगरच्या पदाधिकाऱ्यांकडून भाजप कार्यालयात हनुमान चालिसा पठण करून राज्य शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला .
यावेळी हनुमान चालिसा पठणास विरोध करणाऱ्या राज्य शासनाच्या विरोधात शहरातील भाजपच्या सर्व मंडलनिहाय हनुमान चालिसा पठण कार्यक्रम घेण्याच्या सूचना महानगराध्यक्ष यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिल्या. राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून ‘जय श्रीराम, जय हनुमान’चा जयघोष करत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
राणा दाम्पत्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईविरोधात भाजप पदाधिकाऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला. तसेच हनुमान चालिसा पठण करणाऱ्यांवर राज्य शासन कारवाई करणार असेल तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करून दाखवावी; असे आव्हान भाजप पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.