मुंबई, 29 मे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाली आहे. रात्री उशीरा देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आले, यानंतर दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. या भेटीचं कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे. पण या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजपमध्ये काही मुद्द्यांवरून खटके उडाले आहेत, त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
कर्नाटक निवडणुकीमध्ये भाजपचा दारूण पराभव झाला, यानंतर राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला होता. राज ठाकरेंच्या या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं. यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरेंनी आशिष शेलार यांना टोला हाणला.
‘नाक्यावर सभा घेणारी माणसं…’, कर्नाटकच्या निकालावरून राज ठाकरे-आशिष शेलारांमध्ये जुंपली
आरबीआयने काहीच दिवसांपूर्वी दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यावरूनही राज ठाकरेंनी टीका केली. जर तज्ज्ञांशी बोलून दोन हजार रुपयांची नोट चलनात आणण्याचा निर्णय घेतला असता तर आज ही वेळच आली नसती, असं राज ठाकरे म्हणाले.
नोटबंदी आणि कर्नाटक निवडणुकीच्या निकालावरून आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना खोचक सल्ला दिला. राज ठाकरे यांना आमचं निवेदन आहे की तुम्ही उत्तम नेते आहात, अभ्यास करता पण सर्व विषयावर बोललं पाहिजे असं नाही. तुम्ही व्यक्तिगत माझ्यावर बोलाल तर ठीक आहे. पण तुम्ही आमच्या सर्वोच्च नेत्यांवर बोलाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आम्ही धरसोड करणारे नाही, मोदीजी जे करतात ते प्रामाणिकपणे करतात, असा टोला शेलार यांनी राज ठाकरे यांनी लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.