महाराष्ट्रात मशिदीत लाऊडस्पीकरबाबत सुरू असलेले राजकारण आता चांगलेच तापले आहे. लाऊडस्पीकर-अजान वादावर भाष्य करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे महाराष्ट्राचे ओवेसी असे वर्णन केले आहे. संजय राऊत यांनी लाऊडस्पीकरच्या वादावर बोलताना आधी भाजपवर हल्लाबोल केला आणि नंतर राज ठाकरे हे भाजपसाठी महाराष्ट्राचे ओवेसी असल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केलीय.
संजय राऊत पुढे म्हणाले की, एआयएमआयएमचे प्रमुख ओवेसी यांनी उत्तर प्रदेशात जे काम केले, ते काम भाजपला राज ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्रात करून दाखवायचे आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर सामना वृत्तपत्राच्या कार्यालयाबाहेर पोस्टर पाहायला मिळाले. या पोस्टरमध्ये लिहिले आहे की, ‘तुम्ही ओवेसी कोणाला बोलला? संजय राऊत, आधी तुम्ही तुमचा लाऊडस्पीकर बंद करा. मिळालेल्या माहितीनुसार, हे पोस्टर मनसेने लावले आहे की दुसरे कोणी? याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, मशिदीवरील भोंगे न हटवल्यास हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा देणारे राज ठाकरे येत्या हनुमान जयंतीला काय करणार याच्या चर्चा होत्या. आज हनुमान जयंतीला राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यात महाआरती होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज ठाकरे पुण्यात कालच पोहोचले आहेत. पुण्यातील खालकर मारुती चौकात राज ठाकरे यांच्या हस्ते ही महाआरती होणार आहे. एका अर्थी मशिदीवरच्या भोंग्यांविरोधी आंदोलनाचा हा श्रीगणेशा असल्याचंच राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. आधी मुंबई, नंतर ठाणे आणि आता पुण्यात राजगर्जना होणार आहे. दरम्यान जे पोस्टर मनसेनं बनवलं आहे त्यावर राज ठाकरे यांचा ‘हिंदुजननायक’ असा उल्लेख करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे राज्याच्या राजकारणावर उमटलेले पडसाद अजूनही विरलेले नाहीत. 3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा, अन्यथा देशभरात हनुमान चालिसा लावणार, या भूमिकेवर राज ठाकरे ठाम आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात महाआरती होणार आहे.