राणा दाम्पत्याच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. आज राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. शनिवारी (30 एप्रिल) झालेल्या सुनावणीत न्यायालयाकडून निकाल राखून ठेवण्यात आला होता. मुंबई सत्र न्यायालय आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा जामीन अर्जावर आज आपला निकाल जाहीर करणार आहे. न्यायाधीश आर. एन. रोकडे हे राणा दाम्पत्याचा निकाल करणार आहेत.
दरम्यान शनिवारी झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही बाजूंच्या वकिलांनी सुमारे अडीच तास युक्तिवाद केला. राणा दाम्पत्यावर धार्मिक भावना भडकावल्याचा आणि देशद्रोहाचा आरोप आहे.दरम्यान, आमदार रवी राणा यांच्याविरोधात 17, तर खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात 6 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांनी राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध केला आहे. न्यायालयात जामिनाला विरोध करताना मुंबई पोलिसांनी सांगितले की, नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप आहेत. राणा दाम्पत्य तुरुंगातून बाहेर पडून प्रकरणावर प्रभाव टाकू शकते, असा सरकारचा युक्तिवाद आहे. दुसरीकडे राणा दाम्पत्याच्या वकिलांनी युक्तिवाद करताना राणा दाम्पत्य जबाबदार नागरिक असून सर्व अटी पाळणार असल्याचे सांगितले. सुनावणीदरम्यान वकिलाने देशद्रोहाच्या आरोपावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यादरम्यान वकिलाने राणा दाम्पत्याच्या ८ वर्षांच्या मुलीचाही संदर्भ दिला. मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थानाजवळ हनुमान चालीसाचे पठण करून द्वेष निर्माण करण्याचा याचिकाकर्त्यांचा हेतू नसल्यामुळे कलम १५३ (ए) अंतर्गत आरोप कायम ठेवता येणार नाही, असे राणा दाम्पत्याने याचिकेत म्हटले आहे.