मुंबई :
‘ऑपरेशन गंगा’ (Operation Ganga) अंतर्गत काल सकाळी युक्रेनमधील (Ukraine) भारतीयांना घेऊन सातवे विमान रोमानियातील बुखारेस्ट येथून मुंबईत (Mumbai) दाखल झाले. या विमानातून युक्रेनमध्ये अडकलेले १८२ भारतीय मायदेशी परतले. यावेळी केंद्र सरकारचे प्रतिनिधी या नात्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी विमानतळावर देशवासीयांचे स्वागत केले होते आणि विद्यार्थ्यांना दिलासा दिला होता. मात्र यावेळी माध्यमांशी बोलताना राणे यांचा देश आणि देशाच्या राजधानीचा उल्लेख चुकला अन् ते सोशल मिडीयावर ट्रोल होण्यास सुरुवात झाले.
यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले, मी विमानात जावून सर्वांना भेटलो. हे विद्यार्थी अतिशय भयभीत अवस्थेमध्ये होते. मी त्यांना सांगितले की तुम्ही भारतात सुखरुप पोहचले आहात. त्यामुळे कोणीही घाबरुन जाण्याचे कारण नाही. तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ऑपरेशन गंगा व्यवस्थित चालू आहे. मात्र अजून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारमधील ४ मंत्र्यांची नेमणूक करण्यात आली असल्याचेही माहिती राणे यांनी दिली.
यावेळी पत्रकाराने राणे यांना विद्यार्थ्यांना तिथून भारतात आणताना कशाप्रकारे अडचणी आल्या? अशा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, सर्व जण युक्रेनमध्ये होते. तिथली परिस्थिती पाहून ते बरेच घाबरले होते. त्यामुळे ते नजिकचा देश ओमानिया आणि त्याची राजधानी बुखारिया या ठिकाणी गेले. तिथून ते विमानातून भारतात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. वास्तविक हे विमान ओमानिया नाही तर रोमानिया येथून आले होते आणि या देशाच्या राजधानीचे नाव बुखारिया नसून बुखारेस्ट असे आहे. हीच गोष्ट समोर आल्यानंतर नारायण राणे सोशल मिडीयावर ट्रोल होत आहेत.
सिंधुदुर्गस्थित युक्रेनवरुन परतलेल्या विद्यार्थ्यी यावेळी बोलताना म्हणाला, खूप आनंद होत आहे. मुंबईत पोहचलो आहे. सरकारकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. पण बॉर्डर क्रॉस करण्यासाठी बराच वेळ लागला. खूप गर्दी होती. मला माझ्या शहरापासून ८ किमी. चालत यावं लागलं. तसेच यापुढे देखील भारत सरकारने असाच प्रतिसाद देत माझ्या मित्र-मैत्रिणींना देखील बाहेर काढावं अशीही अपेक्षा त्यांने व्यक्त केली.