रायचंद शिंदे, प्रतिनिधी
पुणे, 17 एप्रिल : राज्यात दिवसेंदिवस अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यप्रदेश येथून कांदे काढण्यासाठी आलेल्या परप्रांतीय मजुराच्या 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली.
तुमच्या शहरातून (पुणे)
12 वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करत त्याला ठार केले. या घटनेने परिसरात बिबट्याची मोठी दहशत पसरली आहे. संजीव बाशीराम झमरे, असे मृत मुलाचे नाव आहे. तो मूळ रा. टेमला राजपुर, ता. राजपूर, जि. बिडवाणी, मध्यप्रदेश येथील रहिवासी होता. पण कांदे काढण्यासाठी आपल्या परिवारासह जुन्नर तालुक्यातील ओतूर जवळच्या जाकमाथा येथे आला होता. रविवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास लघुशंकेसाठी हा मुलगा शेतात गेला होता. याचवेळी बिबट्याने हा हल्ला केला. या हल्ल्यामधे मुलाचा मृत्यु झाला आहे.
बाशीराम जालू झमरे हे त्याच्या कुटुंबासह पांडुरंग ताजने रा आतुर यांच्य शेतात कांदे काढण्यासाठी आले होते. तसेच शेतातच राहत असताना हा हल्ला झाला. मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश मधील जवळपास 5 हजार मजूर जुन्नर-आंबेगाव तालुक्यात कांदे काढण्यासाठी दाखल झाले आहेत आणि हे मजूर रात्री शेतातच झोपत असल्याने हा प्रकार घडला आहे.
या घटनेची माहिती राजेश पांडुरंग वाघ यानी वनविभागाला कळवली. यानंतर घटनास्थळी तातडीने जुन्नर वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे, ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एम. काकडे, पी. के. खोकले, के. एस. खरोड़े, वनरक्षक फुलचन्द खंडागले, साहेबराव पारधी यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर मुलाचे मृतदेह ताब्यात घेऊन जुन्नर येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला.
वनविभागाचे आवाहन –
दरम्यान, या घटनेनंतर वनविभागामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कामासाठी बाहेर राज्यातून आलेल्या मजूराची संबंधित शेतकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी. राहत्या ठिकानी प्रकाश ठेवावा. लहान मुलांना रात्रीच्या वेळी बाहेर एकटे सोडू नये. भागत पिंजरे लावण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असेही वनविभागाने म्हटले आहे.
तर दोन दिवसांपूर्वी आंबेगाव तालुक्यातील तळेघर येथे अंगणात खेळणाऱ्या लहान मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. त्यात ती जखमी झाली. तर 1 महिन्यापूर्वी खेड तालुक्यातील आदिवासी भागात एक तरुण बिबट्याच्या हल्यात ठार झाला होता. त्यामुळे मागील काही दिवसात बिबट्याचे मानवावर हल्ले वाढत चालले असल्याने मोठी चिंता व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.