रायगड, ता. २२ फेब्रुवारी
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील उसर या गावी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आज संपन्न झाले. या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहून अत्यंत समाधान वाटले.
एका अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या प्रकल्पाची आज सुरुवात होत आहे. महाविद्यालय काढणे तशी अवघड गोष्ट नसते, मात्र वैद्यकीय महाविद्यालय काढणे ही अवघड गोष्ट आहे. कारण त्यासाठी कमीत कमी ५०० ते ७०० बेड्सचे हॉस्पिटल असावे लागते आणि वैद्यकीय कर्मचारी वर्ग व साधनसामग्री लागते. त्यात किमान ५०० कोटींची गुंतवणूक सुरुवातीला करावी लागते. ती गुंतवणूक केल्यानंतर महाविद्यालयासाठी वेगवेगळ्या सुविधा उभाराव्या लागतात. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, कर्माचाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारावी लागतात. हे अवघड काम खा. श्री. सुनील तटकरे, आदिती तटकरे, राज्य सरकार व सरकारमधील संबंधित मंत्री मिळून करत आहेत. या सर्वांचे तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या स्थानिक नागरिकांचे मी अभिनंदन करतो. या जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी लोकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला आहे.
मागील दोन वर्षांत कोविड संकटात हॉस्पिटलची गरज किती आहे, ते आपल्याला कळले. अशी रोगराई आल्यानंतर काय होतं, हे आपल्याला जाणवलं. या काळात लोकांनी मुंबई सोडली आणि गावाला यायला लागले. गावाला येणारी आकडेवारी आपण पाहिली तर ती लाखोंच्या घरात होती. नेहमी मुंबईकरांचे स्वागत करणारे गावकरी याकाळात स्वागत करण्यास इच्छूक नव्हते. मुंबईवरून उत्तर प्रदेश, बिहार या राज्यात सुरुवातीला लोक पायी निघाले. कामगारांची ती अवस्था पाहून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बसेसची व्यवस्था करून दिली. केंद्राने रेल्वे द्याव्यात यासाठी पाठपुरावा केला. या सर्व संकटाच्यापाठी होता एक महारोग. या एका रोगाने संबंध जग आणि देशाला संकटात ढकलले. कोविडमुळे हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज तसेच आरोग्य सुविधांची किती गरज आहे, याचा अंदाज आपल्याला आला.
या सगळ्या संकटाच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस काम केले. अनेकांनी आपले प्राण गमावले. पण महाराष्ट्राचे वैशिष्ट्य असे की, संकट आल्यानंतर लोक बाकी सगळं विसरून संकटावर मात करण्यासाठी काम करतात. तेच काम आज मला इथे होताना दिसत आहे.
इथे वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल उभारले जात आहे. महाविद्यालय सुरू होण्याआधीच ७० विद्यार्थ्यांनी ॲडमिशनही घेतले आहे. ज्यांनी ज्यांनी या कामात पुढाकार घेतला, त्या सर्वांना मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो.
हा जिल्हा जागरूक असा जिल्हा आहे. वेळप्रसंगी लोकांचे दुःख दूर करण्यासाठी कष्ट करणाऱ्यांचा हा जिल्हा आहे. उत्तम शेती आणि मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांचा जिल्हा आहे. रायगड जिल्ह्याने अनेक संकटांवर आजवर मात केली आहे. नेतृत्वाची खाण असलेला हा जिल्हा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा बारकाईने अभ्यास करणारे देशाचे पहिले अर्थमंत्री सी. डी. देशमुख देखील याच जिल्ह्याचे होते. सी.डी. यांच्यासारखेच नारायण नागो पाटील, बी.व्ही. पाटील, दत्ता पाटील अशी अनेक नावे यानिमित्ताने घेता येतील.
अशा या जिल्ह्याची गरज लक्षात घेऊन राज्य सरकार आणि इतर सहकाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला. एका ठरलेल्या काळात हा प्रकल्प पूर्ण होईल, अशी आशा करतो. या प्रकल्पाच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करण्याचे महत्त्वाचे केंद्र बनेल. असे म्हटले जाते की, रुग्णसेवा ही ईश्वरसेवा असते. या माध्यमातून या वास्तूमध्ये ईश्वरसेवा घडेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.