रायगड :
ता.०९जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने बाधित झालेल्या रायगड जिल्ह्यातील गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाकरिता १३ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे . दिनांक २२ व २३ जुलै, २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मौजे तळीये, कोंडाळकरवाडी व बौध्दवाडी,मौजे केवनाळे व पोलादपूर तालुक्यातील मौजे साखर (सुतारवाडी) ही गावे बाधीत झाली होती तसेच मनुष्यहानी देखील झाली होती. दरड कोसळून बाधित झालेल्या नागरीकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.त्याच अनुषंगाने या गावांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनाकरीता भुसंपादन तसेच नागरी व सार्वजनिक सोयी सुविधा, विद्युत पुरवठा तसेच जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा करणे या कामांकरीता १३ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत महाड तालुक्यातील मौजे तळीये, कोंडाळकरवाडी व बौध्दवाडी मध्ये भुसंपादन करण्यासाठी २ कोटी ९२ लाख १७ हजार ७६१ रूपये, मौजे केवनाळे मध्ये भुसंपादन करण्यासाठी ६४ लाख २६ हजार १४८ रूपये, पोलादपूर तालुक्यातील मौजे साखर (सुतारवाडी) साठी ३८ लाख ४१ हजार ७८६ रूपये असे एकूण भुसंपादनासाठी ३ कोटी ९४ लाख ८५ हजार ६९५ रूपये तर महाड तालुक्यातील मौजे तळीये तर कोंडाळकरवाडी व बौध्दवाडी मध्ये नागरी व सार्वजनिक सोयी सुविधा, विद्युत पुरवठा तसेच जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा करणे या कामांकरीता ९ कोटी ३० लाख १६ हजार ५५२ रूपये निधीची तरतूद करण्यात आली आहे असे एकूण १३ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णयही ८ फेब्रुवारी २०२२ रोजी निर्गमीत करण्यात आला आहे.