मयूरभंज, 6 मे : वीजपुरवठा खंडीत होणे आपल्यासाठी नवीन नाही. अगदी शहरी भागातही लोकांच्या घरातील बत्ती गुल होते. मात्र, आज चक्क राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या भाषणादरम्यान वीज खंडीत झाली. शनिवारी ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील बारीपाडा येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणादरम्यान बत्ती गुल झाली. असे असतानाही राष्ट्रपतींनी आपले भाषण सुरूच ठेवले. वीज गेल्यावरही माईक यंत्रणा काम करत होती. भाषणात मुर्मू म्हणाल्या की, विजेचा आमच्याशी लंपडाव सुरू आहे. कार्यक्रमात उपस्थित श्रोतेही मुर्मू यांचे भाषण अंधारात ऐकत राहिले.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतींच्या कार्यक्रमादरम्यान शनिवारी सकाळी 11.56 ते दुपारी 12.05 वाजेपर्यंत नऊ मिनिटे वीज खंडित झाली होती. वीज नसल्याने संपूर्ण सभागृहात अंधार होता. मात्र, या अंधारातही राष्ट्रपतींनी आपले भाषण सुरूच ठेवले. वीज खंडित झाल्यानंतरही द्रौपदी मुर्मू यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करणे थांबवले नाही. त्या हसत हसत म्हणाल्या की, “आजचा हा कार्यक्रम बघून विजेलाही आमचा हेवा वाटू लागला आहे. आपण अंधारात बसलो आहोत पण अंधार आणि प्रकाश दोन्ही बरोबरीने घेऊ.”
महाराजा श्री रामचंद्र भांजदेव विद्यापीठाच्या 12व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती बोलत होत्या. 11:56 ते 12:05 या वेळेत कार्यक्रमात वीजपुरवठा खंडित झाला. वातानुकूलित यंत्रणाही कार्यरत होती. मुर्मू ह्या मूळच्या ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूरच्या असून लोक त्यांना धरतीची लेक म्हणतात.
विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मागितली माफी
विद्यापीठाचे कुलगुरू संतोष कुमार त्रिपाठी यांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्या अभिभाषणादरम्यान वीज पुरवठा खंडीत झाल्याबद्दल माफी मागितली. ते म्हणाले, या दुर्दैवी घटनेसाठी मी स्वतःला दोषी समजतो. याची आम्हाला लाज वाटते. आम्ही या घटनेची निश्चितपणे चौकशी करू आणि या घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल.
वाचा – ‘अजित पवारांचा पिंड फील्ड वर..’ भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेवर शरद पवारांनी दिलं उत्तर
राज्य सरकारच्या मालकीच्या उद्योग विकास निगम लिमिटेडने या कार्यक्रमासाठी जनरेटरचा पुरवठा केला होता. आम्ही त्यांच्याशी याबद्दल बोलू. टाटा पॉवर, नॉर्थ ओडिशा पॉवर डिस्ट्रिब्युशन लिमिटेडचे सीईओ भास्कर सरकार यांनी सांगितले की, इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये काही बिघाड झाल्यामुळे वीज गेली असावी.
चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन
दरम्यान, ही वीज खंडित होण्याची घटना लोक सहजासहजी स्वीकारत नाही आहेत. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमातही वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटनेचा लोकांकडून निषेध केला जात आहे. या घटनेनंतर मयूरभंज जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीसाठी त्रिसदस्यीय समितीही स्थापन करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.