नागपुर । प्रतिनिधी
भारतातील प्रसिद्ध बजाज कंपनीचे राहुल बजाज सर्वेसर्वा होते. बजाज कंपनीला देशातील उद्योग क्षेत्रात आघाडीवर नेण्यात राहुल बजाज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. उद्योग क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी राहुल बजाज यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या निधनामुळे उद्योग जगताची झालेली हानी कधीच भरून येणार नाही, असे मत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
राहुल बजाज यांनी बजाज ऑटो कंपनीची धुरा सुमारे पन्नास वर्षं यशस्वीपणे सांभाळली. राहुल बजाज यांना त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखलं जायचं. कोणत्याही पक्षाचं सरकार असो ते त्यांच्याबाबत स्पष्ट शब्दात आपलं मत नोंदवायचे. राहुल बजाज भारताच्या त्या निवडक उद्योजक कुटुंबातील होते, ज्यांचं नातं थेट देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंशी होतं. वर्ध्यातूनच जमनालाल बजाज यांनी त्यांच्या उद्योगाला सुरुवात केली. त्यानंतर ते महात्मा गांधीजींच्या संपर्कात आले आणि त्यांच्या आश्रमासाठी जमनालाल बजाज यांनी जमीन दान दिली. जमनालाल बजाज यांना महात्मा गांधींचा ‘पाचवा मुलगा’ म्हटलं जायचं. त्यामुळे नेहरूही जमनालाल बजाज यांचा आदर करायचे. राहुल बजाज यांच्या हाती कंपनीची धुरा आली तेव्हा व्यापाराच्या दृष्टीने कठीण परिस्थिती होती. त्याच परिस्थितीत बजाज यांनी तथाकथितपणे निरंकुश पद्धतीने उत्पादन केलं आणि स्वतःच्या कंपनीला देशातल्या सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक करण्यात यश मिळवलं. बजाजची स्कूटरने भारतीय बाजारपेठेत वेगळं स्थान प्राप्त केलं होतं. या स्कूटरसाठी पंधरा-पंधरा वर्षे वेटिंग लिस्ट असायची. चेतकची ‘हमारा बजाज’ ही जाहिरात आज सुद्धा अनेकांच्या लक्षात असेल. अफाट कष्टातून उद्योग विश्व निर्माण करणारे राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योग क्षेत्राची मोठी हानी झाल्याचेही शिवानीताई वडेट्टीवार यांनी मत व्यक्त केले.