मुंबई, 5 मे : भारताचा विकेटकिपर आणि फलंदाज रिषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झाल्याने मागील अनेक महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. योग्य उपचार झाल्याने पंतच्या प्रकृतीत सुधारणा होत असून सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याचे पुनर्वसन व्यवस्थापन सुरु आहे. अशातच रिषभ पंतने आपल्या प्रकृतीबाबत अपडेट देणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो पाहून त्याच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
30 डिसेंबर 2022 रोजी भारताचा युवा क्रिकेटर रिषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला होता. या अपघातात रिषभ पंत गंभीर जखमी झाल्याने त्याच्या पायावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. या दुखापतीमुळे रिषभ पंत बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्याला देखील मुकला आहे. पायावर शस्त्रक्रिया झाल्याने रिषभ पंतला चालण्यात देखील अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे तो चालण्यासाठी अनेक महिने वॉकिंग स्टिकचा आधार घेत होता. मागील चार महिने तो या वॉकिंग स्टिकच्या आधारानेच चालताना दिसत होता. परंतु आता रिषभ पंतच्या प्रकृतीत सुधारणा होत असून तो वॉकिंग स्टिकच्या आधाराशिवाय चालू लागला आहे.
रिषभ पंतने शुक्रवारी त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून यात रिषभ पंत वॉकिंग स्टिकच्या आधाराशिवाय चालताना दिसत आहे. या व्हिडिओत रिषभ पंत हातातील स्टिक ट्रेनरकडे सोपवून कोणत्याही आधाराशिवाय बिनदिक्कतपणे चालताना दिसला. यामुळे त्याने फॅन्स देखील आनंदित झाले असून या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत. सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे त्याचे पुनर्वसन व्यवस्थापन सुरु असून यात पंत दुखापतीतून लवकर सावरताना दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.