राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.सध्या रुपाली चाकणकर यांच्याकडे राज्य महिला आयोगाचं अध्यक्ष पद आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवला आहे. चाकणकर या पुण्याच्या महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा म्हणून काम पाहत होत्या. त्यानंतर त्यांना प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा म्हणून संधी मिळाली . राज्यात २०१९ च्या विधासभा निवडणुकीच्या वेळी महिला राष्ट्रवादीच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी अचानक राजीनामा दिल्यानं त्या जागी रुपाली चाकणकर यांना संधी मिळाली होती.
चाकणकर यांच्याकडे महिला आयोगाचं अध्यक्षपद देखील आहे. त्याचवेळी त्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष देखील होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या राजीनामा देणार अशी चर्चा होती. अखेर रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीकडून लवकरच नव्या महिला अध्यक्षाची घोषणा होईल, अशी माहिती समोर येत आहे.
रुपाली चाकणकर यांच्यावर महिला आयोगाच्या कामाचा मोठा भार आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्यापासून त्यांनी अतिशय नेटाने काम करुन अनेक मोठी प्रकरणं हाताळली आहेत. महिलांना न्याय मिळावा यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ म्हणत विदर्भ, उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्याच्या ठिकाणी महिला आयोगातर्फे त्यांनी शिबीरं घेतली. महिला आयोगाचं काम अतिशय ताकदीने हाताळताना त्यांना राष्ट्रवादी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीकडे वेळेअभावी म्हणावं असं लक्ष देता येत नव्हतं. कदाचित याच कारणामुळे त्यांनी राजीनामा दिलेला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.