मुंबई, 29 मार्च : आयपीएलच्या 16 व्या सीजनला आता लवकरच सुरुवात होणार आहे. 31 मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना चेन्नई विरुद्ध गुजरात या संघांमध्ये खेळवला जाणार असून क्रिकेटचा उत्सव सुरु होणार असल्याने फॅन्समध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परंतु अशातच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयसीसी वनडे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर वर्क लोड मॅनेजमेंटमुळे आगामी आयपीएल सीजनचे सामने खेळणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र यावर मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी मोठं विधान केलं आहे.
आयपीएलच्या 16 व्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 2 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघासोबत होणार आहे. परंतु यापूर्वी बुधवारी सकाळी एका वृत्तपत्राने वर्क लोड मॅनेजमेंटमुळे मुंबई इंडियन्स चा कर्णधार रोहित शर्मा हा आगामी आयपीएलचे काही सामने खेळणार नसून त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव हा मुंबईचे नेतृत्व करेल अशी शक्यता व्यक्त केली होती. आज मुंबई इंडियन्सची पहिली पत्रकार परिषद मुंबईत पारपडली. यावेळी पत्रकारांनी रोहितला आयपीएलमधील काही सामन्यात विश्रांती घेण्याबाबत प्रश्न विचारला यावेळी रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर उपस्थित होते.
रोहित शर्मा यावर म्हणाला, “माझ्या विश्रांतीच्या बाबत, मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर उत्तर देतील”. यावर प्रशिक्षक बाउचर म्हणाले, “तुला विश्रांती घ्यायची आहे का?” पुढे ते म्हणाले, ” रोहित संघाचा कर्णधार आहे. आशा करतो की तो आगामी आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्मात असेल आणि तो विश्रांती घेऊ इच्छित नाही. पण हो आम्ही सर्वच स्पर्धा सुरु झाल्यानंतर वेगवेगळ्या परिस्थितीतून जाणार आहोत. जर मला रोहितकडून कर्णधार आणि एक खेळाडू म्हणून चांगला परफॉर्मन्स मिळाला तर खूप चांगले होईल. त्यानंतर त्याला 1 किंवा 2 सामन्यांसाठी विश्रांती हवी असेल तर मी ते त्याला देईन. त्यावेळी मला काहीच हरकत नसेल.”
मुंबई इंडियन्स संघ सध्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल करता सराव करीत असून तब्बल दोन वर्षांनी संघ आपल्या होम ग्राउंडवर परतला आहे. यंदा मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहणं उत्सुकतेचं असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.