नवी दिल्ली, 13 मे : टी२० वर्ल्ड कपसाठी अद्याप बराच कालावधी आहे. मात्र बीसीसीआय आणि सेलेक्टर्सकडून वर्षाच्या सुरुवातीपासूनच याची तयारी सुरू केली आहे. याची सुरुवात हार्दिक पंड्याला टी२० टीमचे नेतृत्व सोपवून केली. अखेरच्या दोन वर्ल्ड कपमध्ये निराशाजनक कामगिरी झाल्यानंतर वरिष्ठ खेळाडूंबाबात बीसीसीआयने मोठी पावले उचलली आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत टीम इंडिया 2024 टी-20 वर्ल्ड कपमध्ये नव्या दमाचा संघ उतरवणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. आता रोहित शर्मा आणि केएल राहुल टी20मध्ये फॉर्ममध्ये नसल्याचं दिसत आहे. तर शुभमन गिल सर्व फॉरमॅटचा सलामीवीर म्हणून आता पुढे येत आहे. IPL 2023 मध्ये यशस्वी जैस्वालच्या धमाकेदार खेळानंतर सलामीसाठी दुसरा पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय.
रोहित-राहुलचा फॉर्म हरवला
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, “नक्कीच, नव्या दमाची आणि उदयास येणारी ही नवी प्रतिभा टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण असेल. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधील शानदार कामगिरीनंतर यशस्वी जैस्वालवर आमचं लक्ष आहे. रोहित आणि केएल राहुलला टी-20 संघात स्थान आहे की नाही हे सध्या सांगणं घाईचं होईल. पण सध्याची परिस्थिती पाहता त्यांची कामगिरी निराशा करणारी आहे, अशा परिस्थितीत टी-20 मध्ये नव्या सलामीच्या जोडीची गरज आहे.
रोहित-राहुलची T20 कारकीर्द धोक्यात
केएल राहुल मांडीच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला. पण, याआधी त्याने खेळलेल्या सर्व सामन्यांमध्ये स्ट्राइक रेटमुळे त्याच्यावर टीका झाली. 9 सामन्यात राहुलने 113 च्या स्ट्राईक रेटने फक्त 274 धावा केल्या. T20मध्ये स्ट्राइक रेट महत्त्वाचा ठरतो आणि 113चा स्ट्राइक रेट ओपनिंगला करणाऱ्या फलंदाजाच्या कारकिर्दीला साजेसा नाही.
यशस्वीची फटकेबाजी
भारताचा कर्णधार रोहित शर्मा कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये फॉर्मशी झगडत आहे. IPL 2023मध्ये आतापर्यंत रोहितने 11 सामन्यात 17च्या सरासरीने आणि 124 च्या स्ट्राईक रेटने 191 धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वालने IPL 2023 मध्ये 11 सामन्यांमध्ये 52 च्या सरासरीने आणि 167 च्या स्ट्राइक रेटने 575 धावा केल्या आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय संघासाठी त्याने दरवाजा ठोठावला आहे. यशस्वीने कालच्या सामन्यात केवळ 13 चेंडूत अर्धशतक ठोकले. पॉवरप्लेमध्ये तो वेगवान फलंदाजी करत होता. या आयपीएलमधील पॉवरप्लेमध्ये त्याने 179 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. lj शुभमन गिलने 47 च्या सरासरीने आणि 144 च्या स्ट्राईक रेटने 469 धावा केल्या आहेत.
यंदा वनडे वर्ल्ड कप असून रोहित शर्मा आणि केएल राहुलचे लक्ष या मोठ्या स्पर्धेवर असेल. अशा परिस्थितीत निवड समिती आयर्लंड दौऱ्यात सलामीवीर म्हणून यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांना संधी देण्याची शक्यता दाट आहे. आयपीएलमधील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात यशस्वी जैसवाल यशस्वी ठरला तर राहुल आणि रोहितची टी-20 कारकीर्द धोक्यात येऊ शकते. ईशान किशन हासुद्धा सलामीला पर्याय आहे. मात्र, त्याचा गेल्या काही सामन्यातला फॉर्म म्हणावा तितका चांगला नाही. पण, तोही सलामीला खेळण्यासाठी दावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.