राजा मयाल, प्रतिनिधी
ठाणे, 29 मे : लग्नाचा मुहूर्त जवळ येत चालला होता. पाहुण्यांची लगबग सुरू होती. वर लग्नामंडपात वधूची वाट बघत बसला होता. लग्नघटिका जवळ येऊ लागली आणि वधू विवाहस्थळी पोहोचण्यासाठी लिफ्टद्वारे निघाली. पण लिफ्ट अचानक बंद पडली आणि सगळ्यांचा जीव टांगणीला लागला. अग्निशनम दलाच्या जवानानांना पाचारण करण्यात आलं. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन 20 मिनिटांनंतर लिफ्टमध्ये अडकलेल्या वधूला बाहेर काढलं. रात्री 8 च्या मुहूर्तापूर्वी हे बचाव कार्य यशस्वी झालं आणि वधूवराचं लग्न सुखरूप पार पडलं. सोमवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास भाईंदर येथे ही घटना घडली.
काय आहे प्रकरण?
तुमच्या शहरातून (मुंबई)
भाईंदर येथे राहणार्या प्रिती वागळे या तरुणीचं सोमवारी लग्न होतं. भाईंदर पश्चिमेच्या राई येथील विनायक नगर येथील सभागृहात लग्न सोहळा सुरू होता. रात्री 9चा मुहूर्त होता. सगळेजण वधूची वाट बघत होते. तयारी करून रात्री सव्वा आठच्या सुमारास नवरी मुलगी आपल्या तीन बहिणी आणि दोन लहान भावांसोबत तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी निघाली. मात्र, अचानक लिफ्ट बंद पडली. ऐनवेळी लिफ्ट बंद पडल्याने मोठा बाका प्रसंग उद्भवला. उदवहनात अडकल्याचे संकट एकीकडे तर दुसरीकडे लग्नाचा मुहूर्त चुकण्याची भीती. कुटुंबियांचा जीव टांगणीला लागला.
या प्रसंगाची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारीही पोहोचेले. 20 मिनिटांच्या प्रयत्नानंतर उदवहनात अडकलेल्या वधूसह इतरांची सुटका करण्यात आली आणि तिचे लग्न सुखरूप पार पडले. उदवहनातील अडकलेल्या इतर महिलांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आम्हाला घटनेची माहिती मिळताच उदवहनात अडकलेल्या महिलांची सुखरूप सुटका केली, अशी माहिती अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.