प्रसून/धनबाद, 23 एप्रिल : लग्नाच्या वेळी लोक अनेकदा वाढून-चाढून सांगतात. पण, लग्नानंतर सत्य समोर आल्यानंतर पती-पत्नीच्या नात्यात दुरावा येतो. याच पर्यवसन वादातही होते. झारखंडमधील धनबादमध्ये असेच एक प्रकरण समोर आले आहे. जिथे दाम्पत्याचा घरातील वाद थेट रस्त्यावर पोहचला. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डीजीएमएस क्वार्टरजवळील रस्त्यावर पती-पत्नीमध्ये हायव्होल्टेज ड्रामा झाला. घटनास्थळी दोघांचे नातेवाईकही पोहचले. नवरा-बायकोच्या भांडण्याने रस्त्यावर तुफान गर्दी झाली होती. हा ड्रामा बऱ्याचवेळ सुरू होता. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस आले आणि सर्वांना पोलीस ठाण्यात नेले.
वास्तविक, धनबादच्या आझाद नगरमधील तरुणीचा विवाह डीजीएमएस क्वार्टरमध्ये राहणाऱ्या तरुणाशी चार वर्षांपूर्वी झाला होता. महिलेचा आरोप आहे की, लग्नाच्या वेळी तरुणाने स्वत:ला सीबीआय अधिकाऱ्याचा सहाय्यक असल्याचे सांगितले होते. या नावाने हुंडा म्हणून मोठी रक्कमही घेतली. मात्र लग्नानंतर तो रुग्णवाहिकेचा चालक असल्याचे सत्य समोर आले. माझ्याशी खोटं बोलून लग्न करण्यात आलं.
महिलेचे सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप
याबाबत बोलताना पती आणि त्याच्या घरच्यांनी मारहाण केल्याचे महिलेचे म्हणणे आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन पोलीस ठाण्यात तक्रारही करण्यात आली आहे. पण दोघांमध्ये समेट झाला. यानंतर पोलीस ठाण्यातून घरी पोहोचल्यावर मला पुन्हा मारहाण करण्यात आली. मला जीवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. कसा तरी जीव वाचवून मी घरातून पळ काढला आणि मदतीसाठी आरडाओरडा केला, तेव्हा माझ्या आजूबाजूचे लोक जमा झाले, ज्यांनी माझा जीव वाचवला.
वाचा – Gay App वरून मैत्री झाली अन् बायकोशीही ठेवलं संबंध, नंतर जे घडलं ते भयानक
पतीने आरोप फेटाळले
महिलेच्या पतीचे म्हणणे आहे की, माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप निराधार आहेत. बायको खोटं बोलत आहे. तिला तिच्या सासरच्या घरी राहायचे नाही. अनेकदा माहेरीच असते. माझ्या घरी आल्यावर आई आणि इथल्या इतर कुटुंबीयांशी भांडण करते. माझ्यावर कुटुंब सोडून एकटे राहण्यासाठी दबाव आणते. कुठलीही थाप देऊन लग्न झालेले नाही. मी व्यवसायाने ड्रायव्हर असून यातूनच मी आपला उदरनिर्वाह करतो, असे लग्नापूर्वी सांगितले होते, असं पतीचे म्हणणे आहे.
पोलिसांकडून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन
या प्रकरणी धनबाद सदर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक रजनीश कुमार यांनी न्यूज18 लोकलला सांगितले की, रस्त्यात पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. सर्वांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. हे प्रकरण महिला पोलीस ठाण्यात आधीपासूनच सुरू असल्याचे पत्नीचे म्हणणे आहे. दोन्ही पक्षांशी बोलून वादाची माहिती घेतली जात आहे. पोलिसांकडून योग्य ती कारवाई केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.