काठमांडू, 21 एप्रिल : सध्या भारतात आयपीएल २०२३ चा हंगाम रंगला आहे. दिवसेंदिवस स्पर्धेची रंगत वाढत चालली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेपाळच्या एका खेळाडूने मोठा विक्रम केला आहे. जगातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक असणाऱ्या राशिद खान आणि वेगवान गोलंदाज असणाऱ्या मिशेल स्टार्कलासुद्धा जी कामगिरी जमली नाही ती लामिछानेनं केलीय. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी डावात १०० विकेटचा टप्पा गाठण्याची कामगिरी संदिप लामिछानेने केली.
संदिप लामिछानेनं फक्त ४२ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये विकेटचं शतक पूर्ण केलं. याआधी सर्वात कमी सामन्यात १०० विकेट पूर्ण करण्याचा विक्रम राशिद खानच्या नावावर होता. त्याने ४४ सामन्यात विकेटचं शतक केलं होतं. तर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क आहे. त्याने ५२ सामन्यात बळींच शतक पूर्ण केलं होतं. याशिवाय या यादीत पाकिस्तानचा सकलेन मुश्ताक चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने ५३ सामन्यात १०० विकेट घेतल्या होत्या. तर न्यूझीलंडचा शेन बॉडने ५४ सामन्यात ही कामगिरी केली होती.
असं कोण खेळतं? गोलंदाज चेंडू टाकत असताना रसेलची विचित्र कृती; पाहा VIDEO
नेपाळ आणि ओमान यांच्यात एकदिवसीय सामना सुरू आहे. या सामन्यात नेपाळने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ८ बाद ३१० धावा केल्या आहेत. त्यानंतर ओमानचा संघ फलंदाजीला उतरला आहे. ओमानची अवस्था २३ षटकात ४ बाद ९८ अशी झाली होती. यातल्या तीन विकेट संदिप लामिछानेने घेतल्या आहेत.
संदीप लामिछानेवर नेपाळ क्रिकेट संघाने बंदी घातली होती. ही बंदी मागे घेतल्यानतंर त्याने मैदानावर पुनरागमन केलं आहे. त्याच्यावर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाला होता. यानंतर त्याच्याविरोधात अटक वॉरंटही जारी झालं होतं. तर नेपाळ क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्याला १२.५३ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. दरम्यान, अंतिम निर्णय येईपर्यंत त्याच्यावर देशातून बाहेर जाण्यावर बंदी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.