पुणे, 22 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांना तपास यंत्रणांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप केला, याचसोबत त्यांनी महाविकासआघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला तसंच पंतप्रधानपदावरही भाष्य केलं. आम्ही वाटेल ती किंमत मोजू, पण दबावाला बळी पडणार नाही. आमचा रस्ता आम्ही सोडणार नाही, असं पवारांनी स्पष्ट केलं.
चुकीचं काम करणाऱ्यांना संरक्षण मिळत आहे. नवाब मलिकांना त्रास दिला गेला, मीडियासमोर जे सांगत होते, त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. मलिक ज्यांच्यावर आरोप करत होते, त्यांच्यावर सीबीआयने कारवाई केली आहे, म्हणजेच नवाब मलिकांची भूमिका सत्यावर आधारीत होती ते स्पष्ट झाल्याचं शरद पवार म्हणाले. अनिल देशमुखांनाही नाहक तुरुंगवास भोगावा लागला, देशमुखांवर अतिरंजित आरोप करण्यात आल्याचंही पवारांनी सांगितलं.
दोन हजार रुपयांच्या नोटबंदीवरही शरद पवारांनी निशाणा साधला. लहरी माणसाने निर्णय घ्यावे तसे निर्णय घेतले जात आहेत, अशी टीका शरद पवारांनी केली. पुणे जिल्हा बँकेला नोटा बदलून द्यायची जबाबदारी दिली गेली नाही, त्यामुळे बँकेचं मोठं नुकसान झाल्याचं शरद पवार म्हणाले.
तुमच्या शहरातून (पुणे)
अजनी वन, कोराडी ते कोल वॉशरी, विदर्भ दौऱ्यात आदित्य ठाकरेंची पर्यावरणासाठी बॅटिंग
महाविकासआघाडीचा फॉर्म्युला
महाविकासआघाडीच्या जागावाटपाबाबत अजिबात चर्चा झाली नाही. माझ्याच घरी बैठक झाली. प्रत्येक पक्षाने दोन-दोन सहकारी द्यावेत आणि त्यांनी सगळ्यांनी बसावं. काही अडचण आली तर मी आहे, उद्धव ठाकरे आहेत, काँग्रेसकडून सोनियाजी किंवा खर्गे आहेत, आम्ही मार्ग काढावा, अशी सूचना करण्यात आली. कुणाला किती जागा, याची काहीच चर्चा झाली नाही, असं शरद पवार म्हणाले.
मुंबईसाठी वेगळा प्लान?
‘मुंबई महापालिकेमध्ये कसं जावं यासंदर्भात आमची चर्चा होणार आहे. काँग्रेसने स्वतंत्र लढावं, बाकीच्यांनी स्वतंत्र लढावं, असं काही लोकांचं मत आहे. हे फायद्याचं आहे का नाही? याबाबत वेगवेगळी मतं आहेत, पण याच्यात काहीही निर्णय झालेला नाही’, असं शरद पवारांनी सांगितलं.
शिवसेना आता महाविकासआघाडीमध्ये तिसरा भाऊ झाल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, त्यावरही शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. पहिलं, दुसरं तिसरं कोण हे महत्त्वाचं नाही. प्रत्येकाचं स्थान महत्त्वाचं आहे. आम्हाला प्रत्येकाचं महत्त्व सांभाळून एकत्र काम करणं आमची जबाबदारी आहे, ते आम्ही करणार, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. तसंच आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, आपण निवडणूक लढणार नाही. विरोधकांना एकत्र आणण्याचं काम करत आहोत, हेदेखील शरद पवारांनी स्पष्ट केलं.
युतीची सत्ता आल्यास मुंबईत कोणाचा महापौर? शंभूराज देसाईंनी स्पष्टच सांगितलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.