कर्तृत्वाला वयाची बंधनं नसतात, कुठल्याही क्षेत्रातली मुशाफिरी आणि त्यातलं यश हे केवळ दूरदृष्टी, जिद्द, चिकाटी यांवरच अवलंबून असतं. त्यापुढं वयाची बंधनं थिटी पडतात. यशाच्या आलेखांना कष्टांची पार्श्वभूमी लागते आणि मगच जगाच्या ओठी तुमचे विजयगान विलसते. शून्यापासून सुरुवात झालेला प्रवास एका जबाबदार पदापर्यंत येऊन ठेपतो, याचाच अर्थ ती तुमच्या यशाची व अविरत संघर्षाला मिळालेल्या मान्यतेची पावती असते.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील दरेगाव या गावी शेतकरी कुटुंबात जन्मलेले प्रा. बालाजी गाढे पाटील यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते तथा महाराष्ट्र काँग्रेसचे अभ्यासू मीडिया पॅनललिस्ट पदा पर्यंतचा संघर्षमय प्रवासही असाच थक्क करणारा आहे. दरेगावच्या जि.प.शाळेत त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेत असतानाच त्यांच्यातील वक्तृत्वाचे गुण दिसून आले. कुठलाही राजकीय वारसा नसलेल्या कुटुंबात बालाजीराव गाढे पाटील लहानाचे मोठे झाले. मोठे बंधू शिवहरी गाढे पाटील यांच्यामुळे बालपणापासूनच पुस्तकांशी मैत्री जडली. महाविद्यालयीन शिक्षण जनता कॉलेज, नायगाव येथून तर उच्चशिक्षण पुण्याच्या नामांकित फर्ग्युसन काॅलेजमधून त्यांनी पुर्ण केले आणि तेथेच त्यांच्या आयुष्याला सूर गवसला आणि तेथेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळा आयाम मिळाला. वाचन, व्यासंगी वृत्ती, आणि फर्डे वक्तृत्व या त्रिसुत्रीच्या बळावर त्यांच्या व्यक्तिमत्वाची पायाभरणी झाली. दिवसेंदिवस राजकीय घराणेशाहीची मूळ घट्ट होत जाण्याऱ्या आजच्या काळात सर्वसाधारण कुटुंबातला युवक स्वकर्तृत्वावर वेगळं अस्तित्व निर्माण करतो, ही बाब या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नव्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. हिमालयीन नद्यांच्या वैशिष्ट्यप्रमाणे निखळ, नितळ, सातत्याने प्रवाही असणाऱ्या त्यांच्या व्यक्तिमत्वाला बहुआयामी किनार आहे. लहानपणापासूनच वक्तृत्व आणि नेतृत्वगुण अंगी असल्याने महाराष्ट्रभर फिरून वेगवेगळ्या विषयावर व्याख्याने देत असतानाच त्यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणचे ग्रामजीवन जवळून पाहिल्याने राजकारण हे क्षेत्र त्यांना खुणावू लागले. आणि त्याच क्षेत्राला त्यांनी सर्वस्व मानले. अभ्यासू वृत्ती, समाज मनाची जाणीव, लोकांच्या प्रश्नांशी जोडली गेलेली नाळ व आपला मुद्दा पटवून देण्याचा अभ्यासू कुवत यांमुळेच पक्षातही त्यांच्याकडे अल्पावधीतच मोठी जबाबदारी आली.
अफाट वाचन, व्यासंगी वृत्ती, काॅंग्रेस विचारधारेशी असलेली निष्ठा या जमेच्या बाजू आहेत.आणि म्हणूनच पक्षाच्या मजबूत संघटनात्मक बांधणीसाठी प्रदेश पातळीवरील अनेकानेक म्हत्वाच्या जबाबदाऱ्या आज त्यांच्या खांद्यावर आहेत. आणि त्या जबाबदार यांना सुयोग्य रीतीने न्याय देण्याची ताकदही त्यांच्यात आहे. अलीकडच्या काळामध्ये अतिशय प्रतिष्ठेच्या आणि जबाबदार मानल्या जाणाऱ्या काॅंग्रेसच्या मिडिया पॅनलिस्ट पदी झालेली त्यांची निवड ही त्यांच्या अभ्यासू वृत्तीला व पक्षनिष्ठेला अधोरेखित करते. विषयाचे वेचक ज्ञान, वेधक मांडणी यामाध्यमातून ते पक्षाची भूमिका टिव्ही चॅनेलवरती मांडताहेत. एखाद्या विषयावरची वैचारिक मांडणी करत असताना त्यास लागणारे प्रबळ पुरावे, आकडेवारी, सनावळ्या व पक्षाच्या भूमिकेवर असलेला ठाम विश्वास यांच्या साह्याने ते विरोधी पक्षाच्या प्रवक्त्याला सहज नामोहरम करतात. आणि म्हणूनच मीडिया क्षेत्रामध्ये त्यांच्या नावाचा दबदबा आहे.
युवा राजकारणी ही काही त्यांची एकमेव ओळख नाही, राजकारणाशिवाय ते उत्कृष्ट वक्ते, समाजाची नस ओळखणारे प्रबोधनकार, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, अनेक सामाजिक कार्यामध्ये सातत्याने सहभागी होणारे उत्तम समाजकारणी, व्यासंगी लेखकही ते आहेत. त्यांच्या आजवरच्या प्रवासात त्यांनी चिक्कार माणूसबळ जोडले आहे, त्यात अनेक तरुण आणि वृद्धही आहेत. त्यांच्या प्रवास हा कोणत्याही तरुणाला प्रेरणा आहे, आणि म्हणूनच ते आम्हा तरुणांचे ‘आयकॉन’ आणि ‘आयडॉल’ आहेत. बालाजीराव गाढे पाटील यांच्या यशाचा हा चढता आलेख खेड्या- पाड्यातील, वाडी- तांड्यावरील माझ्यासारख्या असंख्य धडपड्या तरुणांसाठी दिपस्तंभासारखा दिशादर्शक आहे. येणाऱ्या काळात त्यांच्या कर्तृत्वाल यशाचे धुमारे फुटावेत व गावपातळीवरुन सुरू झालेला हा त्यांचा प्रवास संसदेपर्यंत व्हावा, कारण तिथे आज त्यांच्यासारख्या विचारांची फार गरज आहे…
आज त्यांचा जन्मदिन, त्यानिमित्ताने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!