नादिया, 28 एप्रिल : पश्चिम बंगालमध्ये कडक ऊन पडतंय. अशातच दक्षिण बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत उन्हाळ्याच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी नर व मादी बेडकांचं लग्न लावल्याचा प्रकार समोर आला आहे. पाऊस पडावा, अशी आशा बाळगत त्यांचं लग्न लावण्यात आलं. त्यांच्या लग्नात ढोल-ताशा, शंख व घंटी वाजवण्यात आली. सगळा परिसर ‘उलुध्वनी’ने गुंजत होता. रात्रीच्या वेळी हॉचपॉट खाण्याची व्यवस्थाही परिसरातील नागरिकांसाठी करण्यात आली.
उन्हाळ्यात उष्णतेची लाट येणं साहजिक आहे, पण कालबैसाखी कधी येईल हे कुणालाच माहीत नाही. पाऊस पडल्यास झाडं हिरवीगार होतील, थकलेले प्राणी सुटकेचा नि:श्वास टाकतील. मात्र, वैशाख महिन्यात पाऊस नसताना शेतकऱ्यांचे हाल होतात. त्यामुळे पाऊस पडावा यासाठी ते विविध प्रयत्न करतात.
नादियातील शांतीपूर हरिपूर ग्रामपंचायतीच्या सरदार पारा भागात अशी प्राचीन प्रथा पाहायला मिळाली. आदिवासी भागातील रहिवासी कमल फकीर यांनी सांगितले की, ‘गावात अशी बेडकांच्या लग्नाची परंपरा फार पूर्वीपासून होती, हिंदू रीतिरिवाजानुसार मंत्रोच्चार करून बेडकांचे लग्न लावले जाते. असं केल्याने येत्या 24 तासांत नक्कीच पाऊस पडतो.’ पावसाचा देव असलेल्या वरुणदेवाला प्रसन्न करण्यासाठी लग्न लावलं जातं. या वेळी वर आणि वधू दोघेही काली मंदिरात होते. त्यांची मिरवणूक काढून तिथे देवीची प्रार्थना केली जाते.
अयोध्येत मंदिराच्या कामाची लगबग, श्रीरामाची मूर्ती बनवण्याच्या कामालाही सुरुवात
तज्ज्ञांच्या मते, बेडूक हे प्रजननक्षमतेचे प्रतीक मानले जाते. याचे कारण म्हणजे बेडकांची उपस्थिती जगाच्या उदयाच्या सुरुवातीपासूनच होती, असं म्हणतात. बेडूक हा एक असा प्राणी आहे, जो पाण्यात अंडी घालतो, नंतर अंड्यातून लहान बेडूक बाहेर पडतात, मग ते पाण्यातून जमिनीवर येतात. देश-विदेशात विविध ठिकाणी बेडकांचे पुतळेही आहेत. अनेक ठिकाणी बेडकांची पूजा केली जाते.
देवी लक्ष्मीच्या कृपेनं होईल सगळं सुरळीत; शुक्रवारी करण्याचे हे उपाय आहेत खास
या लग्न समारंभाला लोकप्रतिनिधी तपस बिस्वास उपस्थित होते. ही अंधश्रद्धा आहे की नाही असं विचारलं असता ते म्हणाले, ‘लोकप्रतिनिधी म्हणून मला सुख-दु:खात सर्वसामान्यांच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे. याबाबत त्यांची श्रद्धा आहे, त्यांच्या श्रद्धेचा आदर करण्यासाठी मी तिथे पोहोचलो. मात्र, त्यांनी बेडकांना पुन्हा ते राहत असलेल्या परिसरात सोडण्याची विनंती मी केली आहे.’ दरम्यान, या अनोख्या विवाह सोहळ्यामुळे संपूर्ण परिसराला उत्सवाचे स्वरूप आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.