मुंबई 01 जून : समाजात पैसे मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. मात्र सध्याच्या आर्टिफिशिअल इंटिलिजन्सच्या काळात मशीनच्या साह्यानं अनेक गोष्टी करता येतात. असं असलं तरी काही कामांसाठी माणसंच लागतात. त्यामुळे अशा कामांसाठी मनुष्यबळाची मागणी असते व पैसेही चांगले मिळतात. लहान मुलांची आया म्हणून काम करणं हे या पैकीच एक काम असतं. मुलांना सांभाळणं, त्यांची देखभाल करणं, त्यांच्यासोबत वेळ घालवणं या कामाला समाजात फार चांगला दर्जा नाही. मात्र हेच काम करून एखादी आया महिन्याला आयटी कर्मचाऱ्याप्रमाणे पगार मिळवू शकते.
‘नवभारत टाइम्स’नं त्याबाबत वृत्त दिलं आहे. न्यूयॉर्कमध्ये राहणारी ग्लोरिया रिचर्ड ही 34 वर्षांची महिला आया म्हणून काम करते. या कामाद्वारे ती चांगली रक्कम पगारापोटी कमावते. याचं कारण ती अब्जाधीश व्यक्तींच्या मुलांसाठीच आया म्हणून काम करते. तिच्या पगाराचा विचार केला, तर तिला एका तासाचे 167 डॉलर म्हणजेच अंदाजे 13 हजार रुपये मिळतात. महिन्याचा हिशेब केला, तर यापद्धतीनं ती 2 हजार डॉलर मिळवते. याचाच अर्थ तिला महिन्याला अंदाजे 1.6 लाख रुपये मिळतात.
सीएनबीसीच्या रिपोर्टनुसार, आया म्हणून काम करताना इतरही अनेक लाभ मिळतात. खासगी जेटमधून प्रवास, लक्झरी ट्रिप या गोष्टी पगाराशिवाय मिळतात. यामुळेच ही नोकरी इतर नोकऱ्यांच्या तुलनेत वेगळी असते. या वेगळ्या करिअरविषयी ग्लोरियाचे विचारही वेगळे आहेत. वर्षातले केवळ 2 महिने तिला ही नोकरी करावी लागते. उरलेले 10 महिने ती ही नोकरी करत नाही. या कामामध्ये मुलांसोबत राहणं आवडत असल्याचं तिचं म्हणणं आहे. ग्लोरिया गतिमंद मुलांना सांभाळायचं काम करते. त्यामुळे ते इतरांच्या तुलनेत जास्त आव्हानात्मक आहे तसंच तिला त्याचा मोबदला चांगला मिळतो.
आया म्हणून काम करण्यासाठी अनेक मुलाखती दिल्याचं ग्लोरिया सांगते. अनेक मुलाखतींमध्ये मुलं शाळेतून घरी आल्यावर त्यांचा सांभाळ करायचा असल्याबाबत पालक सांगतात. काही वेळेला एखाद्या प्रवासाला जाताना मुलांना सांभाळण्यासाठी म्हणून तिला सोबत नेलं जातं. अशा वेळी त्यांच्या आई-वडिलांची भेटही होऊ शकत नाही असं ग्लोरियाचं म्हणणं आहे. अशा प्रकारे या आया एका दिवसात कमीतकमी 10 घरांमधल्या मुलांना सांभाळतात. मुलांना सांभाळणं हे काम अतिशय जिकिरीचं असतं. त्यातही गतिमंद मुलांचा सांभाळ करताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यामुळेच या कामासाठी जास्त पैसे आकारले जातात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.