विशाल देवकर, प्रतिनिधी
नागपूर, 8 एप्रिल: राज्यात सर्वत्र उन्हाचा तडाखा बसायला सुरुवात झाली असून वातावरणात देखील कमालीचे बदल जाणवत आहेत. विदर्भातील उन्हाळा उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक उष्ण म्हणून गणला जातो. दरवर्षी नागपूरसह विदर्भातील उष्णतेचा पारा 40अंश सेल्सिअसच्या पार पोहोचलेला असतो. यंदा देखील उन्हाळा उष्णतेचे नवे उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. विशेषतः गर्भवती महिलांनी या काळात विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ सुषमा देशमुख यांनी दिला आहे.
उन्हाळ्यात घ्यावी योग्य ती खबरदारी
तुमच्या शहरातून (नागपूर)
उन्हाळ्याची दाहकता लक्षात घेता आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. नागपूर आणि उर्वरित विदर्भात उन्हाळा अतिशय उष्ण म्हणून गणला जातो. विदर्भातील तापमान जास्त असल्याने नागरिकांना आरोग्याबाबत सतर्क राहावे लागते. त्यातच उन्हाचा गर्भवतींना जास्त धोका असतो. त्यासाठी गर्भवती महिलांना आरोग्याची योग्य ती खबरदारी घ्यावी लागते.
गर्भावस्थेत इन्फेक्शन होण्याची शक्यता
महिलांना गर्भधारणेच्या काळात इन्फेक्शन होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. आपली रोग प्रतिकार शक्ती मंदावलेली असल्याने कुठलेही इन्फेक्शन बळावू शकते. त्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे असते. शरीरात काही बदल अथवा त्रास जाणवत असल्यास त्वरित आपल्या डॉक्टरशी संपर्क साधून त्याबद्दल जाणून घेतले पाहिजे. त्यातील काही लक्षणे म्हणजे युरीन करते वेळी जळजळ होणे. युरीनच्या जागी खाज येणे. लघवी कमी प्रमाणात होणे इत्यादी लक्षणे आढळून आल्यास फार चिंता न करता आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
वारंवार पाणी पिण्याची गरज
उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नये. दिवसातून जास्तीत जास्त वेळा पाणी पिण्याने शरीरातील पाण्याची पूर्तता होत असते. पाणी पिल्याने स्वाभाविकच लघवी होत राहील. मात्र ब्लाडरच्या दृष्टीने हे उपयुक्त आहे. वारंवार लघवी केल्याने ब्लाडर साफ व निरोगी राहण्यास मदत होते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे. शौचालयाच्या वेळी स्वच्छ करताना हात पुढून मागे हात जायला हवा. मागून पुढे हात यायला नको. प्रसूती काळात या लहान लहान गोष्टी मात्र आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत.
एप्रिल महिन्यातच विदर्भात उष्णतेचा रेकॉर्ड, उन्हाळ्यात अशी घ्या खबरदारी
तर डॉक्टरांचा सल्ला घ्या
पाणी कमी पील्याने लघवी कमी प्रमाणात होत असते मात्र पाणी शक्य तितक्या जास्त प्रमाणात प्यायला हवं. बहुतांश वेळी शरीरातील पाण्याच्या कमतरतमुळे लघवीचा रंग बदलत असतो. पिवळा, गडद पिवळा तर कधी कधी लालसर रंग येऊन क्वचित वेळी रक्त देखील याऊ शकते. अशा वेळी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर उपचार घेणे आणि महत्वाचे म्हणजे वेळेत उपचार घेणे गरजेचे आहे, असा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ सुषमा देशमुख यांनी दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.