साहेबराव कोकणे, प्रतिनिधी
अहमदनगर, 17 मे : बाळासाहेब विखे आणि शरद पवार यांचा संघर्ष गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहिला जात आहे. मात्र, जामखेड आणि कर्जतमध्ये याच पवार कुटुंबांना विखे यांनी मदत केल्याचा आरोप भाजपाचे आमदार राम शिंदे यांनी केला आहे, त्यामुळे 40 वर्षांचा संघर्ष संपला की काय? याबाबत चर्चा झाल्या असल्या तरी विखे पिता-पुत्र भाजपात असल्यामुळे आणि भाजपाच्या आमदारांनी आरोप केल्यामुळे या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.
विधानसभेत विरोधी उमेदवाराला मदत केल्यामुळे आमची हार झाली, असा दावा राम शिंदे, शिवाजीराव कर्डीले, मोनिका राजळे, दत्ता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड यांनी केला होता. त्यावेळेस त्यांनी पक्षश्रेष्ठीची भेट घेऊन त्यांच्या कानावर या गोष्टी घातल्या होत्या. मात्र, त्यानंतर सत्तांतराच्या काळात राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूल मंत्री भेटलं आणि त्या आरोपांवर पडदा पडला. मात्र, कर्जत जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांमध्ये जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीच्या पॅनलकडून सुजय विखे यांचे कट्टर समर्थक कैलास वराट आणि सहाय्यक अंकुश ढवळे यांनी उमेदवारी घेऊन शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहिले. त्यामुळे सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विरोधात काम केल्याचा आरोप भाजप आमदार राम शिंदे यांनी केला आहे.
वाचा – निधी वाटपावरून भाजप आमदार नाराज; ..तर राजीनामा देणार, थेट फडणवीसांना पत्र
खासदार सुजय विखे पाटील यांचं स्पष्टीकरण
भाजप आमदार राम शिंदे यांनी जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात काम केले. यावरून टीका केली होती. याला उत्तर देताना खासदार विखे म्हणाले की, ही गोष्ट पक्ष पातळीवर प्रदेशाध्यक्ष आणि आमचे नेते फडणवीस साहेबांसमोर मीटिंग घेऊन त्यांच्यामध्ये जो गैरसमज निर्माण झालेला आहे हा कशामुळे निर्माण झाला याची शहानिशा करावी लागेल. विखे पाटील परिवाराने पवार परिवाराबरोबर संघर्ष केलेला आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मात्र, ही पहिली वेळ आहे की काल मीडियाच्या माध्यमातून विखेंनी पवारांना पाठिंबा दिला, अशी बातमी मला पाहायला मिळाली. या बातमीवर महाराष्ट्रातला कोणीही व्यक्ती विश्वास ठेवणार नाही, असे स्पष्टीकरण दिलं आहे. यावर आता राम शिंदे काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.