मुंबई, 8 मे : आपल्याला झोपेत स्वप्नं पडतात. चांगली, वाईट, अशक्य अशा अनेक प्रकारची स्वप्नं आपण पाहतो. बरेच लोक म्हणतात आपण दिवसभर ज्या गोष्टीचा विचार करत असतो, तेच आपल्याला रात्री स्वप्नामध्ये दिसते. मात्र ही स्वप्नं म्हणजे नक्की काय, ती किती प्रकारची असतात आणि ती का पडतात, याबद्दल जाणून घेऊयात. या संदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने वृत्त दिलंय.
स्वप्न म्हणजे काय?
स्वप्न ही आरईएम (रॅपिड आय मूव्हमेंट) झोपेदरम्यान उद्भवणाऱ्या फोटो, विचार व संवेदनांची मालिका आहे. हा झोपेचा एक टप्पा आहे, जो सामान्यत: झोपेच्या 90 मिनिटांनंतर येतो. आरईएम झोपेच्या दरम्यान, मेंदू अत्यंत सक्रिय असतो, डोळे आणि डायाफ्रॅम वगळता शरीर जवळजवळ पूर्णपणे परॅलाइझ्ड असतं, या अवस्थेतच बहुतेक स्वप्नं पडतात.
आपण स्वप्न का पाहतो?
स्वप्न पाहण्याचा उद्देश पूर्णपणे समजलेला नाही आणि आपण का स्वप्नं पाहतो याबद्दल अनेक थिअरी आहेत. यातील काही जाणून घेऊयात.
भावनांवर प्रक्रिया करण्यासाठी : एका थिअरीनुसार, स्वप्न पाहणं आपल्याला आपल्या भावनांवर प्रक्रिया करण्यास आणि हाताळण्यास मदत करतं. दिवसा, आपल्याला भावनांच्या वाईड रेंजचा अनुभव येतो आणि स्वप्न पाहणं आपल्याला या भावनांना सखोल स्तरावर समजून घेण्यास मदत करू शकतं.
आठवणी एकत्रित करण्यासाठी : आणखी एका थिअरीनुसार, स्वप्न पाहणं आपल्याला आठवणी एकत्रित आणि संग्रहित करण्यास मदत करतं. आरईएम झोपेदरम्यान, मेंदू अत्यंत सक्रिय असतो आणि तो अलीकडील अनुभवांशी संबंधित न्यूरल कनेक्शन मजबूत करण्यासाठी तो कदाचित या वेळेचा वापर करत असेल.
समस्या सोडवण्यासाठी : काही संशोधकांचा असा विश्वास आहे की स्वप्नं पाहण्यामुळे आपल्याला विविध परिस्थिती आणि शक्यतांचा शोध घेण्यास मंजुरी देऊन समस्या सोडवण्यास मदत होऊ शकते. स्वप्नं वास्तविक जीवनातील परिस्थितींसाठी एक प्रकारची रिहर्सल म्हणून काम करू शकतात.
वास्तविकतेचे अनुकरण करण्यासाठी : काही शास्त्रज्ञ असंही म्हणतात की स्वप्न पाहणं हा मेंदूला वास्तविकतेचं अनुकरण करण्याचा आणि भविष्यातील घटनांसाठी तयार करण्याचा एक मार्ग असू शकतो. आपल्या स्वप्नांमध्ये परिस्थिती निर्माण करून, मेंदू आपल्याला जागृत जीवनात अशाच परिस्थितींसाठी तयार होण्यास मदत करू शकतो.
स्वप्नांचे प्रकार
स्वप्नं अनेक रूपं घेऊ शकतात आणि आपल्या भावना, अनुभव आणि वातावरणासह अनेक घटकांनी प्रभावित होऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकारच्या स्वप्नांची काही उदाहरणं जाणून घेऊयात.
चिंतातूर स्वप्नं : ही अशी स्वप्नं आहेत जी चिंता किंवा भीतीच्या भावना दर्शवितात. उदाहरणार्थ, आपण असं स्वप्न पाहू शकता की तुम्ही पडत आहात, तुमचा पाठलाग केला जात आहे किंवा तुम्ही चक्रव्यूहात अडकले आहात. चिंता दर्शवणारी स्वप्नं ही मेंदूला तणावपूर्ण भावनांवर प्रक्रिया करण्याचा आणि हाताळण्याचा एक मार्ग असू शकतो.
ल्युसिड स्वप्नं : ल्युसिड स्वप्नं ही अशी स्वप्नं असतात, ज्यात स्वप्न पाहणाऱ्याला जाणीव असते की ते स्वप्न पाहत आहेत. या प्रकारची स्वप्नं वास्तववादी असू शकतात आणि स्वप्न पाहणारा स्वप्नातील घटनांवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवू शकतो.
इच्छापूर्ती दर्शवणारी स्वप्नं : अशा स्वप्नांमध्ये स्वप्न पाहणाऱ्याच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होतात. उदाहरणार्थ, तुम्ही लॉटरी जिंकली आहे किंवा तुम्ही आदर्श जीवन जगत आहात असं तुम्हाला स्वप्न पडेल. इच्छापूर्तीची स्वप्नं मेंदूसाठी आपल्या गहन इच्छांचा शोध घेण्याचा आणि पूर्ण करण्याचा एक मार्ग असू शकतो.
दुःखद स्वप्नं : दुःखद स्वप्नं ही भयावह असतात, ज्यामुळे स्वप्न पाहणाऱ्याला चिंता किंवा भीती वाटू शकते. अशी स्वप्नं मेंदूला आघाताच्या अनुभवांवर प्रक्रिया करण्याचा किंवा भविष्यातील संभाव्य धोक्यांसाठी तयार करण्याचा मार्ग असू शकतो.
निष्कर्ष
स्वप्नं ही मानवी चेतनेचा एक आकर्षक पैलू आहे आणि आपण त्यांचा उद्देश पूर्णपणे समजू शकत नाही. पण यावर अभ्यास नक्कीच होऊ शकतो. स्वप्नं तुमच्या भावनांवर प्रक्रिया करण्यास मदत करत असोत किंवा तुम्हाला भविष्यातील किंवा भूतकाळातील घटना चित्र स्वरूपात दाखवत असोत ती मानवी मेंदूचं एक अद्वितीय वैशिष्ट आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.