बंगळुरू, 14 मे : कर्नाटकमध्ये काँग्रेसनं भाजपाला पराभवाची धूळ चारत एकहाती सत्ता मिळवली आहे. कर्नाटकमध्ये सत्ता येताच आता नवा मुख्यमंत्री निवडीसाठीच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी आज सायंकाळी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची बैठक पार पडणार आहे. विधीमंडळ पक्षाची बैठक आणि काँग्रेस हायकमांडची परवानगी मिळण्यानंतरच कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री ठरणार आहे.
मुख्यमंत्रिपदाचा पेच
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे दोन्ही नेते इच्छूक असल्यानं मुख्यमंत्री निवडीचं मोठं आव्हान काँग्रेससमोर उभं राहिलं आहे. कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण असावा यासाठी काँग्रेसच्या 136 आमदारांचं मतही विचारात घेतलं जाणार आहे.
मोठी बातमी! कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरला? अंतर्गत कलह टाळण्यासाठी काँग्रेसचा मास्टर प्लान
खर्गे दिल्लीला जाणार
दुसरीकडे काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तब्बल महिनाभरानंतर आज कर्नाटकातून दिल्लीला जाणार आहेत. आज दुपारी ते दिल्लीला पोहोचतील. कर्नाटक निवडणूक विजय, पुढची रनणिती आणि मुख्यमंत्री कोण असावा याबाबत खर्गे दिल्लीमध्ये गांधी कुटुंबाशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरवला जाणार असल्याचं बोललं जात आहे.
सिद्धरामय्या मुख्यमंत्री होणार?
दरम्यान सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार सिद्धरामय्या हे कर्नाटकातील काँग्रेसचे लोकप्रिय नेते आहेत, त्यामुळे काँग्रेस नेतृत्व त्यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या बाजूने आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांची मेहनत आणि त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्रिपदासह अनेक महत्त्वाची खाती मिळण्याची शक्यता आहे. तर दलित समाजाचे जी परमेश्वरा आणि लिंगायत समाजाचे एम बी पाटील यांचंही नाव उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याची माहिती समोर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.