मुंबई, 06 मे : जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. अनेक मुलं, मुली प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आपलं शिक्षण पूर्ण करत असल्याचं आपण पाहतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बऱ्याचदा संघर्ष करावा लागतो. पालक माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर मुलींचा विवाह करुन देतात. त्यामुळे बऱ्याचदा इच्छा असूनही अशा मुलींना शिक्षण पूर्ण करता येत नाही. पश्चिम बंगालमध्ये अशीच एक घटना नुकतीच उघडकीस आली. इयत्ता 11 वीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा तिच्या पालकांनी विवाह निश्चित करण्याचं ठरवले. ही गोष्ट कळताच या मुलीने रात्रीच्यावेळी घरातून पळ काढला आणि ही बाब शासकीय अधिकाऱ्यांना सांगितली. शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असलेल्या या मुलीला अधिकाऱ्यांनी मदत केली. मुलीचा हट्ट आणि अधिकाऱ्यांमुळे पालकांनी तिचा विवाह न करण्याचे आणि शिक्षण पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. हे प्रकरण नेमकं काय आहे, ते जाणून घेऊया. `न्यू इंडियन एक्सप्रेस`ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे पालक तिचा विवाह करण्याचे नियोजन करत होते. पण या मुलीला उच्च शिक्षण घ्यायची तीव्र इच्छा होती. तिला विवाहाच्या नियोजनाविषयी समजताच तिने घरातून पळ काढला. रात्रीच्या अंधारात ती दोन किलोमीटर पळाली. आपली समस्या पश्चिम मिदनापूरमधील चंद्राकोना -II चे बीडीओ अर्थात गटविकास अधिकाऱ्यांना सांगण्यासाठी त्यांचे कार्यालय गाठण्याकरिता तिने बसने 10 किमी प्रवास केला. या मुलीची समस्या ऐकल्यानंतर बीडीओंनी तिच्या आई वडिलांचे मन वळवण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना तिच्या घरी पाठवले. आम्ही तिच्या इच्छेविरुद्ध आणि तिचे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वी तिचे लग्न लावून देणार नाही, असे लेखी आश्वासन तिच्या वडिलांनी दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी या मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणात बत्ती गुल; म्हणाल्या ‘विजेचा आमच्यासोबत..’
पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील चंद्राकोना – II चे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर अमित कुमार घोष यांनी सांगितले, की “ही मुलगी हुशार आणि एक चांगली विद्यार्थिनी आहे. ती तिच्या शाळेच्या क्लबची सदस्य आहे. हा क्लब परिसरातील मुलींच्या अल्पवयीन विवाहाविरुद्ध जनजागृतीचे काम करतो. “
या घटनेविषयी घोष यांनी माहिती दिली. ते म्हणाले, “गेल्या आठवड्यात शुक्रवारी मला एक फोन आला. पलीकडून एक मुलगी कुजबुजत होती. तिला नेमकं काय सांगायचं आहे, हे मला कळत नव्हतं. पण ती संकटात असल्याचं मला जाणवलं. त्यानंतर फोन डिस्कनेक्ट झाला. मी तिच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. कदाचित ती संवाद साधण्याच्या स्थितीत नव्हती, असं मला जाणवलं.“
“दुसऱ्या दिवशी ती मुलगी माझ्या ऑफिसमध्ये आली. तिला अश्रू अनावर झाले होते. तिनं मला तिचं ध्येय साध्य करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली,“ असं घोष यांनी सांगितलं.
या मुलीने बीडीओंना दिलेल्या निवेदनात म्हटलं की, “माझे पालक माझं लग्न करू इच्छितात हे मला समजल्यावर मी विरोध केला. एकतर लग्न कर किंवा घरातून निघून जा असं मला माझ्या वडिलांनी सांगितलं. मला घरातून निघून जायचं होतं; पण त्यांनी मला घरात डांबून ठेवलं. शनिवारी वराकडील मंडळींनी आमच्या घरी येऊन लग्नाला होकार दिला. हे समजताच मी कसातरी तिथून पळ काढण्यात यशस्वी झाले. तिथून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्लॉक हेडक्वार्टरला जाण्यासाठी बसमध्ये बसले. “
या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी सुरुवातीला नाखुशी दर्शवली. पण नंतर त्यांनी आम्ही तिला शिक्षण पूर्ण करून देऊ, असं लेखी देत मान्य केलं. पालकांच्या या लेखी आश्वासनानंतर संबंधित मुलीला कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.