प्रशांत बाग, प्रतिनिधी
मुंबई, 19 एप्रिल : राज्यात सध्या गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. खून, बलात्कार, अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या, यांसारख्या घटना उघडकीस येत आहेत. त्यातच आता मुंबईतून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बापानेच आपल्या 2 वर्षीय मुलाची हत्या केल्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. असद अन्सारी असे मृत मुलाचे नाव आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
या घटनेनंतर हत्येप्रकरणी आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या महिलेशी लग्न करता यावं म्हणून पोटच्या पोरालाच आरोपी पित्याने संपवलं. गळा दाबून आरोपी पित्याने 2 वर्षीय मुलाची हत्या केली. रहमत अली अन्सारी, असे 22 वर्षीय आरोपीचे नाव आहे. तसेच त्याला शाहू नगर पोलिसांनी अटक केली आहे.
बुधवारी सकाळी सायनच्या सर केमकर चौकात प्लास्टिक पिशवीत 2 वर्षीय असद अन्सारीचा मृतदेह सापडला होता. चॉकलेट देण्याच्या बहाण्यानं मुलाला घराजवळील गोडाऊनमध्ये नेऊन गळा दाबून त्याची हत्या करण्यात आली. आरोपीच्या प्रेयसीने पत्नी आणि मुलाचा त्याग करण्याची गळ प्रेयसीने आरोपी प्रियकराला घातली होती. त्यामुळे आरोपीने प्रेयसीची मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्याच पोटच्या 2 वर्षाच्या चिमुरड्याची हत्या केली.
याप्रकरणी पोलिसांनी IPC 302 (हत्या), 201 (पुरावे नष्ट करणे) आणि 364 (अपहरण) या कलमांतर्गत पित्याला अटक केली आहे. तसेच आरोपी रहमतच्या प्रेयसीचीदेखील चौकशी पोलीस करत आहेत. दरम्यान, या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.