नवी दिल्ली 06 मे : लोक पैशासाठी काहीही करायला तयार होतात. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रियातून एक बातमी आली होती, की एका मुलाने आपल्या आईचा मृतदेह वर्षभर घरात लपवून ठेवला होता. आईच्या मृत्यूची बातमी समजली तर मिळणारं पेन्शन बंद होईल, अशी भीती त्याला होती. त्या व्यक्तीने खूप काळजी घेत मृतदेह कुजण्यापासून वाचवला. आता अशीच एक बातमी ब्रिटनमधून समोर आली आहे. इथे पेन्शनसाठी एका व्यक्तीने एका वृद्धाचा मृतदेह जवळपास 2 वर्षे डीप फ्रीझरमध्ये लपवून ठेवला. त्याचा शोध घेत पोलीस तfथे पोहोचले असता त्यांना हे पाहून धक्काच बसला.
द मेट्रोच्या रिपोर्टनुसार, 71 वर्षीय जॉन वेनराईट यांचं सप्टेंबर 2018 मध्ये निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी, ऑगस्ट 2020 मध्ये डॅमियन जॉन्सन नावाच्या व्यक्तीच्या घरी फ्रीजरमध्ये त्यांचा मृतदेह सापडला होता. जॉनच्या मृत्यूनंतर, डॅमियनने त्यांचा मृतदेह लपवून ठेवला जेणेकरून त्याला मिळालेल्या पेन्शनचा वापर करता येईल. 2 वर्षे डॅमियन त्यांच्या नावावर पैसे काढत राहिला. मात्र, नंतर तक्रारीनंतर पोलिसांनी छापा टाकला आणि पोलखोल झाली.
तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, डॅमियन इतका धूर्त होता की त्याने बँक व्हेरिफिकेशनसाठी जॉनच्या बोटांचे ठसेही अनेक वेळा वापरले. फिंगरप्रिंटवरूनच तो खात्यातून पैसे काढत असे. त्या पैशांनी तो खूप शॉपिंग करायचा. मजा करायचा. न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान, त्याने मृतदेह लपविल्याची कबुली दिली परंतु त्याने खर्च केलेले पैसे आपलेच असल्याचा दावा केला. दुसरीकडे, डॅमियनच्या वकिलाने युक्तिवाद केला की जॉनने डॅमियनला त्याच्या खात्याचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं होतं. म्हणूनच तो त्यास पात्र आहे.
जॉन वेनराईटच्या मृत्यूचं कारण काय, हे सध्या तरी पोलिसांना सिद्ध करता आलेलं नाही. पण दोघेही बराच काळ एकत्र राहत होते हे मात्र नक्की. दोघांनी जॉईंट अकाऊंट उघडलं होतं. डॅमियन जॉन्सनने कॅश मशीनमधून पैसे काढण्यासाठी, वस्तूंचे पैसे देण्यासाठी आणि त्याच्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्यासाठी वेनराईटचे बँक कार्ड वापरले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.