फुकुओका (जापान), 5 एप्रिल : गेल्या काही वर्षांत वैद्यकीय क्षेत्राने मोठी प्रगती केली आहे. संशोधनाच्या माध्यमातून दुर्धर आजारांवर उपचार शोधून काढण्यात वैद्यकीय संशोधकांना यश मिळालं आहे. मानवी जन्म आणि त्याची प्रक्रिया या विषयावर जगभरात सातत्याने संशोधन सुरू आहे. या संशोधनातून नेहमीच आश्चर्यकारक निष्कर्ष जगासमोर येतात.
जपानमधल्या संशोधकांनी नुकताच उंदरांवर एक प्रयोग केला. या प्रयोगाची फलनिष्पत्तीदेखील आश्चर्यकारक आहे. या प्रयोगात दोन नर उंदरांना मादीशिवाय पिल्लं झाली आहेत. या नर उंदरांपासून जन्मलेल्या पिल्लांचं आरोग्य उत्तम आहे. जगातलं हे पहिलं संशोधन सध्या चर्चेत आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.
वैद्यकशास्त्रात रोज नवीन संशोधन सुरू असतं. त्यात आता आणखी एका संशोधनाची भर पडली आहे. या संशोधनादरम्यान दोन नर उंदरांनी एका उंदराला जन्म दिला आहे. जपानमधल्या संशोधकांच्या गटाने हे संशोधन केलं असून, यात दोन जैविक नर उंदीर कोणत्याही मादी उंदराशी संबंध न येता पिता बनले आहेत. क्युशू विद्यापीठातल्या संशोधकांनी नर उंदरांच्या पेशींच्या मदतीने अंडी विकसित केली. त्यापासून भ्रूण तयार झाले आणि नंतर उंदराचा जन्म झाला. जगातलं अशा प्रकारचं हे पहिलंच संशोधन आहे. दोन नर उंदरांपासून जन्मलेले उंदीर पूर्णपणे निरोगी आहेत. या पार्श्वभूमीवर दोन नर उंदीर अशा प्रकारच्या प्रक्रियेतून पिल्लांना जन्म कसा देऊ शकतात, असा प्रश्न निर्माण होतो.
या प्रश्नावर दिल्लीतल्या सफदरजंग हॉस्पिटलमधल्या कम्युनिटी मेडिसीन विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. जुगल किशोर यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, `दोन पुरुषांच्या संबंधातून मूल होणं हे सध्या शक्य नाही. मूल जन्माला येण्यासाठी बीजांड आणि शुक्राणूंचा संयोग गरजेचा आहे. यासाठी गर्भाशयाची गरज असते. गर्भाशय केवळ महिलांमध्ये असते; मात्र टेस्ट ट्यूब बेबी किंवा सरोगेट मदरच्या मदतीने अशी शक्यता निर्माण होऊ शकते; पण त्यासाठीही महिलेचं बीजांड आणि गर्भाशय गरजेचं आहे. यासाठी पुरुषाचे शुक्राणू आणि महिलेचं बीजांड मॅच व्हावं लागतं. यासाठी गर्भाशयात शुक्राणू सोडले जातात. शुक्राणू गर्भाशयात पोहोचल्यानंतर नऊ महिन्यांनी मूल जन्माला येतं. टेस्ट ट्यूब बेबी आणि सरोगसीमध्ये अशी प्रक्रिया होते; पण दोन पुरुष मूल जन्माला घालणं शक्य नाही.`
`पुरुषांमध्ये X सह दुसरा छोटा Y क्रोमोझोम (गुणसूत्र) असतो. महिलांमध्ये दोन X क्रोमोझोम असतात. यातून बाळाची लिंगनिश्चिती होते. गेल्या काही काळापासून पुरुषांमधली Y क्रोमोझोमची पातळी घटताना दिसत आहे. ही स्थिती भविष्यात चिंताजनक ठरू शकते. त्यामुळे उंदरांवर झालेलं हे संशोधन पुढे सरकलं पाहिजे. याच्या मानवी चाचण्या व्हायला हव्यात,` असं डॉ. जुगल किशोर यांनी सांगितलं.
दरम्यान, जपानमध्ये उंदरांवर करण्यात आलेल्या या संशोधनादरम्यान नर उंदरांच्या त्वचेच्या पेशींमधून प्रत्येक एक स्टेमसेल तयार केली गेली. त्यानंतर त्यातला Y क्रोमोझोम हटवण्यात आला आणि X क्रोमोझोमची एक डुप्लिकेट तयार केली गेली. यामुळे अंडी विकसित झाली. त्यातून संशोधकांनी 600 भ्रूण तयार केले; पण केवळ सात उंदरांचा जन्म झलाा. अशा प्रकारे जन्मलेले उंदीर निरोगी असल्याचं स्पष्ट झालं आहे. हे जगातलं पहिलं संशोधन असून, यापूर्वी करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या संशोधनात उंदीर जन्माला आले; पण त्यांचा लगेच मृत्यू झाला होता.
हे संशोधन मानवासाठी आशेचे किरण दाखवू शकतात. या माध्यमातून गे मॅरिड कपल्स मूल जन्माला घालू शकतात. अन्य समलैंगिकांसाठीही हे संशोधन फायदेशीर ठरू शकतं; मात्र आतापर्यंत मानवावर अशा प्रकारे कोणतंही संशोधन करण्यात आलेलं नाही; पण भविष्यात संशोधक मानवावर असे प्रयोग करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.