पुणे, 18 मे : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुण्यामध्ये पार पडली, या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत जोरदार टोलेबाजी केली आहे. तसंच कर्नाटकच्या निकालावरूनही त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
ठाकरेंवर हल्लाबोल
‘उद्धवजी सांगतात, जा गावोगावी आणि सांगा आपलाच विजय झालाय. बडवा, आपल्या बापाचं काय जातंय. पण तुमच्या मनात कोणतीही शंका ठेवू नका, पोपट मेला आहे. हे सरकार पूर्णपणे संविधानिक, पूर्णपणे नैतिक सरकार आहे,’ असं फडणवीस म्हणाले.
तुमच्या शहरातून (पुणे)
‘अडीच वर्ष आपण एक सरकार बघितलं, ते सरकार विश्वासघाताचं सरकार होतं. खंडणीखोरांपासून ते दाऊदशी संबंध असलेले मंत्रिमंडळात होते. मुख्यमंत्र्यांना अडीच वर्षात काही तास आपण मंत्रालयात बघितलं. पोलिसांच्या बदल्यांमध्ये वसुलीचं कांडही आपण बघितलं,’ अशी टीका फडणवीस यांनी केली.
‘आम्ही म्हणत होतो तेव्हा आम्हाला महाराष्ट्रद्रोही ठरवत होते. आता वज्रमुठीच्या प्रमुखांनी वज्रमुठीच्या चेहऱ्याबाबत जे लिहिलं आहे, मी पवार साहेबांचे आभार मानतो, आपल्याला काही करण्याची आवश्यकताच नाहीये. उसनं बळ घेऊन वाघ बनता येत नाही. वाघ कधी कधी बनताही येतं, एक सर्कशीतला वाघ असतो आणि एक जंगलाचा राजा असतो. जंगलाचा राजा बनायचं असेल तर स्वत:चं बळ लागतं, उसन्या बळावर कोणी जंगलाचा राजा बनत नाही,’ असा टोलाही फडणवीसांनी ठाकरेंना लगावला.
महाराष्ट्राचं राजकारण बदलणार? प्रकाश आंबेडकरांनी फोडली राष्ट्रवादीतली बातमी
पवारांवरही निशाणा
‘टीआरपी कसा घ्यायचा, त्याचंही आपल्याला प्रशिक्षण घ्यावं लागेल. मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो, मग माझा पक्ष माझ्या राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल. मग माझाच पक्ष ठराव करेल, मग मीच माझा राजीनामा परत घेईन आणि मग मीच माझ्या जागी परत येईन. त्यांनी उद्धवजींना सांगितलं, राजीनामा देतो म्हणणं आणि राजीनामा देणं यातला फरक काय आहे,’ असा निशाणा फडणवीसांनी साधला.
‘नवीनच चालू झालं आहे, कुणी म्हणतं भाकरी फिरवतो. कुणी म्हणतो भाकरी करपणार, काय महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. एक पक्ष भाकरी फिरवणारा, एक पक्ष भाकरीचे तुकडे तोडणारा आणि तिसरा पक्ष पूर्णपणे भाकरीच हिसकावून घेणारा. आपला एकमेव पक्ष आहे, जो गरिबांच्या भाकरीची चिंता करत आहे,’ असं फडणवीस म्हणाले.
कर्नाटकवरून प्रत्युत्तर
‘तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादाने हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेलच, पण पुन्हा एकदा निवडून येईल, पण त्याच वेळी मायक्रो मॅनेजमेंटही अत्यंत महत्त्वाची आहे. कर्नाटकमध्ये आपला पराभव झाल्यानंतर काहींना आनंदाच्या इतक्या उकळ्या फुटायला लागल्या. ज्यांच्या घरी पोरगा पैदा झाला नाही, तेही असे नाचू लागले की मुलगा यांच्या घरीच पैदा झाला. ज्यांचा एक माणूस निवडून आला नाही, तेही बडवून राहिले. जे उभेच राहिले नाही तेही बडवून राहिले. कर्नाटक फॉर्म्युला लागू करणार म्हणणाऱ्यांसाठी, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा धर्मवीर संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. अल्पसंख्याकांचं ध्रुवीकरण करून, या महाराष्ट्र तुम्हाला निवडून होणं शक्य होणार नाही, कारण छत्रपतींनी तयार केलेल्या इथल्या मावळ्याला देव, देश आणि धर्मासाठी कसं लढायचं हे माहिती आहे,’ असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिलं.
‘लांगुलचालन करून कोणताच कर्नाटक पॅटर्न तुम्हाला आणता येणार नाही. इकडे एकच पॅटर्न चालेल तो म्हणजे मोदी पॅटर्न, बीजेपी पॅटर्न आणि छत्रपती शिवरायांचा पॅटर्न, दुसरा पॅटर्न इकडे चालणार नाही,’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.