राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला आज 55 वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या 55 वर्षापासून शरद पवार हे कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सदस्य राहिलेले आहेत. या काळात शरद पवारांनी विविध पद भूषवली आहेत. तब्बल चार वेळा त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. देशाचे सरंक्षणमंत्री, कृषीमंत्री अशा महत्वांच्या पदावर देखील शरद पवार यांनी काम केलं आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. एक अनुभवसंपन्न राजकीय व्यक्तिमत्व म्हणून पवार यांच्याकडं बघितलं जातं. राजकारण, कृषी, सहकार, औद्योगिक, शिक्षण, क्रिडा, महिला धोरण, समाजकारण अशा विविध क्षेत्रात पवारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत बोलायचे झाले तर गेल्या 35 ते 40 वर्षापासून त्यांच्याशिवाय राज्यातील राजकारणाचे पान हालत नाही. शरद पवार हे सत्तेत असो की विरोधात त्यांचे सर्वांशी नेहमी सलोख्याचे संबध राहिले आहेत. दिल्लीच्या राजकारणात देखील त्यांनी स्वत: चे वेगळे स्थान निर्माण केल्याचे अभय देशपांडे यांनी सांगितले आहे.
शरद पवार यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये कृषी क्षेत्राच्या बाबतीत त्यांनी मोठे नर्णय घेतले. फळबाग लागवडीसंदर्भात त्यांनी घेतलेली भूमिका महत्वाची होती. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला. त्याचबरोबर मराठवाडा विद्यापीठ नामांतरणचा निर्णय हा मोठा मानला जातो. काँग्रेस सोडून बाहेर पडलेल्या नेत्यांमध्ये ममता बॅनर्जी सोडल्या तर दुसऱ्या कोणाच्याही पक्षाला त्यांच्या त्यांच्या राज्यात एकहाती सत्ता मिळवता आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव हा पश्चिम महाराष्ट्रात वाढला मात्र, विदर्भ आणि खान्देशात त्यांना ताकद वाढवता आली नाही. कारण महाराष्ट्रात त्यावेळी काँग्रेससारख्या तुल्यबळ पक्षाचे त्यांच्यासमोर आव्हान होते. विदर्भात ज्यावेळी काँग्रेस कमकुवत झाली त्यावेळी ती जागा भाजपने भरुन काढल्याचे देशपांडे यांनी सांगितले आहे.