मुंबई, 6 मे : शरद पवार यांनी अचानक राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पक्षात हाय होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. शरद पवार यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीमधील अनेक बडे नेते अस्वस्थ झाले होते. विधानसभा निवडणूक होईपर्यंत तरी पवारांनी अध्यक्षपद आपल्याकडे ठेवावं अशी गळ पक्षातील बड्या नेत्यांनी पवारांना घातली होती. अखेर शरद पवार यांनी विनंती मान्य करत अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय घेतला.
नेमकं काय म्हणाले राऊत
यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या राजीनाम्याकडे शक्तिप्रदर्शन म्हणून पहाता येईल का? असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना पवारांबाबत घडलेला प्रकार शक्तिप्रदर्शन म्हणता येणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राजीनामा हा पवारांचा भावनिक निर्णय होता. पवार हेच राष्ट्रवादीची ओळख आहे. सर्वच विरोधकांना पवारांची गरज आहे. आम्ही शरद पवारांच्या राजीनामा मागे घेण्याच्या निर्णयामुळे आनंदात आहोत अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे,
तुमच्या शहरातून (मुंबई)
उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया
दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आज उद्धव ठाकरे बारसू दौऱ्यावर आहेत. मात्र बारसूला येऊ देणार नाहीत अशी धमकी देणाऱ्यांना फडणवीसांनी अटक करावं, अशा शब्दात त्यांनी राणेंना टोला लगावला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे आज बारसूमध्ये जाऊन स्थानिकांशी संवाद साधणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.