चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
पुणे, 2 मे : मविआ संपवण्यासाठी भाजप शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीही फोडणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात अगदी काल परवापर्यंत सुरू असतानाच शरद पवारांनी आज असा काही राजीनामा बॉम्ब फोडला की, सगळेच भांबावून गेले आहेत. पण मग पवारांनी असं का केलं असेल बरं? चला तर त्याचीच उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपणही करून पाहुयात.
पवारांच्या राजीनामास्राचा नेमका अर्थ काय?
तुमच्या शहरातून (पुणे)
‘लोक माझे सांगाती भाग 2’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी राजीनामा बॉम्ब फोडला. यानंतर फक्त राष्ट्रवादीच नाही तर महाराष्ट्रातलं राजकारणही ढवळून निघालंय. अनेकांना पवारांची ही भावनिक राजकीय चाल वाटतेय तर काहींना भाजपसोबत जाण्यासाठीचा ‘वे ऑफ’ वाटतोय. कारण गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्यात. अजित पवार यांनीही उघडपणे सीएम होण्याची ईच्छा व्यक्त करून एकप्रकारे या चर्चांना हवाच दिली. पण आयुष्यभर पुरोगामी प्रतिमा जपलेल्या पवारांना या वयात भाजपसोबत जाणं अजिबात मान्य नाही. म्हणूनच पवारसाहेबांनी स्वत: अध्यक्षपदावरून दूर होत एकप्रकारे अजित पवारांना भाजपसोबत जाण्यासाठी वाटच मोकळी करून दिल्याचं बोललं जातंय. ही झाली एक शक्यता.
वाचा – राष्ट्रवादीचा किंगमेकर कोण? जाता जाता पवारांकडून समिती स्थापन, या नेत्यांचा समावेश
आता दुसरी शक्यताही तपासून पाहुयात. आपल्या मागे अध्यक्ष पदावरून पक्षात उभी फूट पडू द्यायची नसेल तर आत्ताच आपल्या डोळ्यासमोरच मुलगी सुप्रिया सुळे यांना अध्यक्षपद मिळवून दिलं तर काय वाईट. आणि समजा अजित पवार यांना निर्णय मान्य नसेलच तर ते भाजपसोबत जातील. कदाचित म्हणून पवार यांनी हे इमोशनल कार्ड खेळल्याचं बोललं जातं आहे. अर्थात अजित पवारांना हा निर्णय फारसा रुचलेला नसल्याचं त्यांच्या बॉडी लँग्वेजवरूनच दिसत होतं.
आपला राजकीय वारसदार साहेब ताई की दादांना निवडणार? या प्रश्नावर पवारांचे जिवलग मित्र विठ्ठल मनियार यांनी दिलेलं उत्तरही मोठं मार्मिक आहे. राजकारणात असं म्हणतात की, पवारांनी खेळलेल्या चाली अनेकदा कालांतराने लक्षात येतात. यावेळीही कदातिच तसंच होणार नाही कशावरून. म्हणूनच तोपर्यंत आपण फक्त राजकीय शक्यतांच्या अंदाजांचे पूलच बांधलेले बरे. कारण ते सरतेशेवटी शरद पवार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.