मुंबई, 28 एप्रिल: सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करताना प्रत्येक प्रवाशानं शांत राहणं आणि आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं, हे अपेक्षित असतं. मात्र, प्रत्यक्षात याच्या एकदम उलट घडतं. बसमधून किंवा इतर सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करताना अनेकजण मोठ्या आवाजात फोनवर बोलतात किंवा मोठ्या आवाजात गाणी ऐकतात. त्यामुळे इतरांना त्रास होतो. ही समस्या टाळण्यासाठी मुंबईतील बेस्ट प्राधिकरणानं प्रवाशांना बसमधून प्रवास करताना मोबाइल फोनवर मोठ्याने बोलण्यास मनाई केली आहे. या शिवाय, जर एखाद्याला प्रवास करताना व्हिडिओ क्लिप पाहण्याची किंवा गाणी ऐकण्याची सवय असेल तर त्यानं इअरफोन्स बाळगणं सक्तीचं केलं आहे. याबाबत बेस्टनं एक परिपत्रक काढलं आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
ही नोटीस बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असल्याचं बेस्टचे जनरल मॅनेजर लोकेश चंद्रा यांनी गुरुवारी सांगितलं. चंद्रा म्हणाले, “आम्हाला प्रवाशांकडून अनेक तक्रारी मिळाल्या आहेत. काही प्रवासी त्यांच्या फोनवर मोठ्या आवाजात गाणी वाजवतात, व्हिडिओ पाहतात किंवा बसमध्ये फोनवर मोठ्या आवाजात बोलतात. विमानात प्रवास करताना संगीत ऐकण्यासाठी हेडफोन वापरण्याच्या सूचना दिल्या जातात. आम्हीदेखील आमच्या प्रवाशांना असेच निर्देश जारी करत आहोत. सह-प्रवाशांना त्रास होऊ नये हा या निर्देशामागील उद्देश आहे.”
बेस्टच्या नवीन निर्देशांचं उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर मुंबई पोलीस कायदा, 1951 च्या कलम 38 अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. चंद्रा म्हणाले, “आमचे कंडक्टर सहप्रवाशांच्या तक्रारींची दखल घेतील (किंवा स्वतःहून दखल घेतील) आणि पुढील कारवाईसाठी गुन्हेगाराला पोलिसांकडे देतील.”
तुमच्या शहरातून (मुंबई)
1 रुपयामध्ये मिळणार नोकरी, मुंबईच्या तरुणाने तयार केलं खास APP
संगीत, आवाज किंवा गोंगाटामुळे लोकांमध्ये चिडचिड, गडबड किंवा अस्वस्थता निर्माण होण्याशी संबंधित असलेल्या या कायद्यात पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड किंवा तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.
अनेक प्रवाशांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ते म्हणाले की, आता मोबाइल फोनमुळे इतर प्रवाशांना त्रास होणार नाही. पण, प्रवाशांच्या एका गटाचं म्हणणे आहे की “मोठ्या आवाजात बोलण्या”ची व्याख्या काय आहे याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही. “अनेक वेळा बसच्या इंजिनचा आवाज आणि आजूबाजूचा आवाज इतका मोठा असतो की फोनवर बोलताना मोठ्यानंच बोलावं लागतं. असं करणं चुकीचं आहे का?” असा प्रश्न नीलेश ठक्कर या प्रवाशानं उपस्थित केला आहे. दुसर्या प्रवाशानं सांगितलं की, जेव्हा लोक बसमध्ये मोठ्यानं गाणी ऐकतात किंवा स्पीकर फोन वापरतात तेव्हा ते त्रासदायक वाटतं.
चंद्रा यांनी निदर्शनास आणून दिलं की, एक मर्यादा निश्चित करणं ही या निर्णयामागील मूळ कल्पना आहे. लोक दिवसभराच्या कामानंतर थकलेले असताना किंवा कामावर जाताना आमच्या बसमधून शांतपणे प्रवास करू शकतील, याची काळजी आम्हाला घ्यायची आहे. बरेचजण प्रवासादरम्यान झोपही घेतात. म्हणून मोठ्या आवाजानं त्यांना त्रास होऊ नये, अशी आमची इच्छा आहे.
बेस्टच्या मालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसेसच्या चालक-वाहकांना दिल्या जाणाऱ्या प्रत्येक बसवर सूचनेची स्टिकर्स लावण्यात येतील.
मोठ्या आवाजाची आणि गाणी ऐकण्याची ही समस्या केवळ बसमध्येच नाही तर लोकल ट्रेनमध्येही आहे. मोबाईल फोनवर मोठ्या आवाजात गाणी वाजवणं आणि मोठ्यानं बोलणं ही समाजकंटक वृत्ती सहप्रवाशांना त्रासदायक ठरते. कंडक्टर आणि तिकीट तपासनीस यांसारख्या अधिकाऱ्यांनी नियमाची काटेकोरपणे अंमबलबजावणी केली पाहिजे आणि गुन्हेगारांना शिक्षा होईल याची खात्री केली पाहिजे. प्रवाशांनीही शांत न राहता तक्रार केली पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.