अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा, 14 मे: अलिकडे ‘रिअॅलटी शो’च्या माध्यमातून अनेक बालकलाकार आपल्या नृत्य व संगित कलेनं प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. सोशल मीडियावरही या चिमुकल्यांचा बोलबाला असतो. वर्धा जिल्ह्यातील असाच एक 14 वर्षीय चिमुकला आपल्या आवाजाच्या जादूनं अनेकांना मंत्रमुग्ध करतोय. पालकांच्या पाठिंब्यामुळं शालेय शिक्षणासोबतच तो गायनही करतोय. आर्ष सुरेशराव चावरे असं या चिमुकल्याचे नाव असून त्यानं अनेक राज्यस्तरीय गायन स्पर्धांतही विजय मिळवला आहे.
बालपणापासूनच गायनाची आवड
तुमच्या शहरातून ( वर्धा)
घरची पार्श्वभूमी संगिताची नसतानाही आर्षला गाण्याची आवड होती. त्यामुळे साडेतीन वर्षाच्या वयापासूनच त्याचं गाणं सुरू झाला. अभंग, भजन आणि गीत देखील तो उत्कृष्टरित्या गायचा. बालपणापासूनच संगीत गुरू विकास काळे, किशोर तळवेकर, अमित लांडगे यांच्याकडून संगीताचे धडे घेतले. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला शिक्षणासाठी आवडेल तो मार्ग स्वीकारण्याचं स्वातंत्र्य दिलं. त्यामुळं त्याचा गायन क्षेत्राकडे ओढा कायम राहिला.
शाळेतील कार्यक्रमातून मिलाली प्रेरणा
आर्षनं तीन वर्षांचा असताना एका शाळेत गाण्याचं सादरीकरण केलं. त्याच्या उत्कृष्ट गायनामुळं प्रथम क्रमांक मिळाला. तेव्हापासून त्याला मंचावर गाण्याची प्रेरणा मिळाली. तेव्हापासून तो वेगवेगळ्या ठिकाणचे मंच आपल्या जादुई आवाजानं गाजवत आहे.
आर्षला मिळाला माई पुरस्कार
या चिमुकल्याने बालपणापासून आपल्या मधुर आवाजाने स्पर्धांमध्ये सहभागी होऊन अनेक बक्षिसं जिंकली. त्याला वर्ष 2019 ला अनाथांच्या आई स्व. सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते माई पुरस्कार मिळाला. तसेच 2021 ला राज्यस्तरीय आदर्श बाल गौरव कलारत्न किड्स आचिव्हर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वर्धातील अनेकांकडून या चिमुकल्याचं कौतुक केलं जात आहे.
‘सॉफ्टवेअर इंजिनियर’ बनण्याचं स्वप्न
आर्षच्या घरी आई-वडील, आजोबा आणि लहान भाऊ आहे. गायन कला जोपासतानाच त्याचं शिक्षणही सुरू आहे. त्याला भविष्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर बनण्याची इच्छा आहे. तसेच ईश्वरानं दिलेली गायनकलाही जपण्याचा ध्यास त्यानं घेतला आहे. आर्षला संदीप चीचाटे, शशिकांत बागडगे, यशवंत प्लेरिया, किरण पट्टेवर, दिलीप मेने या वरिष्ठांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभतेय. संगीत क्षेत्रात आर्ष उत्तुंग भरारी घेईल अशी त्याच्या चाहत्यांची प्रार्थना आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.