मुंबई, 19 मे : आर्यन खान ड्रग्स प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सीबीआयने समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी हायकोर्टामध्ये सुनावणीच्या वेळेस समीर वानखेडे यांच्याकडून शाहरुख खानसोबतचे चॅट समोर ठेवण्यात आले. शाहरूख खाननं समीर वानखेडे यांच्याकडे मुलगा आर्यन खानला सोडवण्यासाठी विनंती केल्याचं चॅटमधून समोर आलं आहे.
शाहरुख खानसोबतचे चॅट बाहेर का काढण्यात आले? याबाबत समीर वानखेडे यांच्या वकिलांनी मोठा खुलासा केला आहे. ‘पेटिशनमध्ये समीर वानखेडे यांचे चॅट शाहरुख खान आणि ज्ञानेश्वर सिंग यांच्यासोबत आहेत. आर्यनने जामीन मिळवताना हायकोर्टामध्ये शपथपत्रावर सांगितलं की कोणत्याही विभागीय अधिकाऱ्याविरोधात कोणतीही तक्रार नाही. सोशल मीडियावर समीर वानखेडेंवर राजकीय चिखलफेक सुरू आहे, राजकीय वर्तुळात समीर वानखेडेंवर खोटे आरोप लावले जात आहेत, या आरोपांना आपला पाठिंबा नाही, असंही आर्यनने हायकोर्टामध्ये सांगितलं’, असं समीर वानखेडेंचे वकिल म्हणाले.
आर्यन खान अटक प्रकरणी मोठी अपडेट; शाहरूख आणि समीर वानखेडेंची चॅट समोर, Chat चा पहिला फोटो
तुमच्या शहरातून (मुंबई)
‘शाहरुखचे चॅट बघितले तर एक बाप आपल्या मुलासाठी जी विनंती करतो ती त्याने केली आहे. पैशांबाबत काही असतं, तर त्या चॅटमध्ये त्याचा उल्लेख असता. आम्ही इतके पैसे दिले, एवढ्याची डिमांड होती, एवढ्यामध्ये सेटल झालं, असं कोणतंही चॅट कॉनव्हर्सेशन नाही. शाहरुख खान समीर वानखेडेंना प्रामाणिक अधिकारी म्हणत आहे. एक बाप दुसऱ्या बापाला विनंती करत आहे, की माझ्या मुलावर लक्ष ठेव, असं शाहरुख सांगत आहे. माझ्या मुलाची काळजी घ्या, त्याच्याकडून काही चूक झाली असेल तर ती सुधारू, ज्यामुळे त्याचं पुढचं आयुष्य चांगलं होईल, असं शाहरुख म्हणत आहे. याच मार्गावर समीर वानखेडेंचा तपास सुरू होता’, अशी प्रतिक्रिया समीर वानखेडेंच्या वकिलांनी दिली आहे.
‘समीर वानखेडेंवर लावलेले आरोप निराधार आहेत, हे आरोप निराधार आहेत, हे दाखवण्यासाठीच शाहरुख खानची चॅट दाखवण्यात आले’, असा खुलासा समीर वानखेडे यांच्या वकिलांनी केला आहे.
वानखेडेंना दिलासा
आर्यन खान ड्रग्स प्रकरणातल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून समीर वानखेडे यांना हायकोर्टाने तूर्तास दिलासा दिला आहे. समीर वानखेडेंनी तपासामध्ये सहकार्य करावं, तूर्तास त्यांना अटक करणार नाही, अशी ग्वाही सीबीआयने हायकोर्टात दिली. वानखेडेंनी सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांकडे जाऊन आपला जबाब नोंदवावा, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. हायकोर्टाच्या आदेशामुळे समीर वानखेडे यांना 22 मे पर्यंत अटकेपासून संरक्षण मिळालं आहे. उद्या सीबीआय वानखेडेंचा जबाब नोंदवणार आहे, त्यानंतर 22 मे रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.