मुंबई, 20 मे : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चॅलेंज केलं आहे. त्यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. आधी वरळीमध्ये निवडणुका होऊ द्या, मग समजेल कोणाचा पोपट मेला आहे, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं. यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला आहे. मुनगंटीवार हे जर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माझ्यासमोर निवडणुकीसाठी उभा करणार असतील तर मी आज राजीनामा देतो असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
शिंदे सरकारवर निशाणा
दरम्यान सध्या राज्यात सुरू असलेल्या दंगलीवरून देखील आदित्य ठाकरे यांनी शिंदे, भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. ‘राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना कुठेही अशा जातीय दंगली घडल्या नव्हत्या. पुढच्या निवडणुकीच्या तयारीसाठी आता असं राज्यात होत आहे का?’ असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी दोन हजारांच्या नोटबंदीवरून देखील भाजपवर निशाणा साधला आहे. देशाच्या आर्थिक परिस्थितीवर काय परिणाम होईल याचा अभ्यास करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
उद्धव ठाकरे उपस्थित का नव्हते?
आज सिद्धरमाय्या यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्यासाठी काँग्रेसकडून उद्धव ठाकरे यांना देखील निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र उद्धव ठाकरे या सोहळ्यासाठी गेले नाहीत, यावर देखील आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे हे आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे या सोहळ्याला जाऊ शकले नाहीत. मात्र आम्ही शुभेच्छा पाठवल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.