मुंबई, 19 एप्रिल : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातली सुनावणी मागच्या महिन्यात संपली, यानंतर आता याचा निकाल कधीही लागू शकतो. ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदेंसह 16 आमदार अपात्र होतील आणि हे सरकार कोसळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपकडून मात्र सरकारला कोणताही धोका नसल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
काहीच महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती केलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी याबाबत मत मांडलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरेंपेक्षा वेगळी भूमिका मांडली आहे.
‘सुप्रीम कोर्टाचा निकाल जरी आला तरी सुप्रीम कोर्टाला कोणालाही अपात्र करण्याचा अधिकार नाही, त्यामुळे कोर्टाच्या निर्णयातून डिसक्वालिफिकेशन होईल, असं मला वाटत नाही. तेव्हाच्या उपाध्यक्षांच्या निर्णयाला स्टे देण्यात आला होता. तो स्टे कदाचित उठवला जाईल, अशी परिस्थिती आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
राज्यपालांच्या अधिकारांमध्ये कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही. हा घटनात्मक मुद्दा आहे, त्यामुळे राज्यपालांनी घेतलेला निर्णय योग्य का अयोग्य, याबाबत सुप्रीम कोर्ट भाष्य करू शकत नाही. निर्णयातून राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले जातील, असं मला वाटतं, पण राज्यपालांचा निर्णय उलट केला जाऊ शकणार नाही,’ असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
काहीच दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी दोन राजकीय भूकंप होतील, असं भाकीत वर्तवलं होतं. या भाकितावर ते अजूनही ठाम आहेत. राजकीय भूकंप होतो, त्यावेळी छोट्या छोट्या साईन दिसत असतात. भूकंप होता होता थांबला, अशी परिस्थिती आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये साकीनाका येथे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या इफ्तार पार्टीला मशिदीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी या विभागातील मौलवी आणि मुस्लिम समाजाच्या मान्यवर व्यक्तींसह इफ्तारीचा आस्वाद घेतला. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया सुद्धा दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.