मुंबई, 9 एप्रिल : आज आयपीएल 2023 चा 14 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात पारपडला. या सामन्यात हैद्राबादने पंजाबचा पराभव केला. सनरायजर्स हैद्राबादने पंजाब किंग्सवर 7 विकेट्सने विजय मिळवून यंदाच्या आयपीएलमधील पहिला विजय नोंदवला. तर यासह पंजाबसाठी शिखर धवनने केलेली झुंजार खेळी व्यर्थ ठरली.
सनरायजर्स हैद्राबादचे होम ग्राउंड असलेल्या राजीव गांधी स्टेडियमवर आज पंजाब किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात सुरुवातीला पंजाब किंग्सचा संघ मैदानात फलंदाजीसाठी उतरला. परंतु फलंदाजीत पंजाबची सुरुवात अत्यंत खराब झाली. सर्व खेळाडू स्वस्तात बाद होत असताना कर्णधार शिखर धवन मात्र अखेर पर्यंत आपल्या संघासाठी लढला. त्याने 66 चेंडूत नाबाद 99 धावा केल्या. शिखर धवनच्या व्यतिरिक्त केवळ सॅम करनने 22 धावांची खेळी केली. इतर कोणत्याही फलंदाजाला दोन अंकी धाव संख्या करता आली नाही. पंजाबने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 147 धावा केल्या.
हैद्राबाद समोर विजयासाठी 148 धावांच आव्हान असताना हैद्राबाद संघाची सुरुवात चांगली झाली नाही. चौथ्या ओव्हरमध्ये पंजाबच्या अर्शदीपने हॅरी ब्रुकची विकेट घेतली. परंतु त्यानंतर हैद्राबादच्या फलंदाजांनी जोर पकडला. हैद्राबादकडून हरी ब्रुकने 13, मयांक अग्रवालने 21 , राहुल त्रिपाठीने 74 तर एडन मार्करमने 37 धावा केल्या. यात राहुल आणि एडन मार्करमने नाबाद खेळी केली. अखेर सनरायजर्स हैद्राबादचे होम ग्राउंडवर 17 चेंडू आणि 8 विकेट्स राखून विजयची आव्हान पूर्ण केले आणि आयपीएल 2023 मधील पहिला विजय नोंदवला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.