मुंबई, 27 मार्च : भारताचा विस्फोटक फलंदाज शिखर धवन त्याच्या मैदानातील खेळाप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत येत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने पत्नी आयेशा मुखर्जी सोबत झालेल्या घटस्पोटाविषयी बोलून खळबळ उडवून दिली होती. तर आता शिखरने एका मुलाखतीत त्याला लहानपणी एचआयव्ही टेस्ट करावी लागल्याचा खुलासा केला आहे.
शिखर धवन मागील काही महिन्यांपासून भारताच्या मुख्य टीममध्ये खेळताना दिसला नाही. सध्या त्याची जागा ही युवा फलंदाज शुभमन गिलने घेतली असून बऱ्याच सामन्यांमध्ये शुभमन कर्णधार रोहित सोबत सलामी फलंदाज म्हणून मैदानात उतरतो. शिखर धवनने एका मुलाखतीत त्याच्या लहानपणी त्याला एचआयव्ही म्हणजेच ह्युमन इम्युनोडेफिशियनसी व्हायरस इन्फेक्शन टेस्ट करावी लागल्याचा किस्सा सांगितला आहे.
Virat Kohli New Tattoo : विराट कोहलीचा नवीन टॅटू पाहिला का? नक्की काय आहे त्यात खास
शिखर धवन हा टॅटू प्रेमी आहे. त्याला लहानपणापासूनच टॅटू काढण्याची इच्छा होती. तो 15 किंवा 16 वर्षाचा असताना मनाली येथे फिरवण्यासाठी गेला असताना त्याने रस्त्याच्याकडेला असलेल्या एका टॅटू काढणाऱ्या व्यक्तीकडून त्याने त्याचा पहिला टॅटू काढला. टॅटू काढल्याचीबाब त्याने कुटुंबापासून काही महिने लपवून ठेवली. परंतु काही महिन्यांनी त्याच्या वडिलांना ही गोष्ट समजली.
धवनने टॅटू काढल्याचे समजताच त्याचे वडील त्याला खूप ओरडले. ते म्हणाले, टॅटू काढण्यासाठी वापरण्यात येणारी सुई ही अनेक लोकांच्या शरीरावर टॅटू काढण्यासाठी वापरली जाते. धवनने सांगितले की ही गोष्ट समजल्यानंतर तो खूप घाबरला होता. त्यानंतर त्याने एचआयव्ही टेस्ट केली आणि ती निगेटिव्ह यावी यासाठी खूप प्रार्थना करीत होता.
अखेर धवनच्या एचआयव्ही टेस्टचा रिपोर्ट आला आणि तो निगेटिव्ह होता. यानंतर धवनने त्याच्या आयुष्यात त्याचे टॅटू प्रेम जपण्यासाठी प्रोफेशनल टॅटू आर्टिस्टकडून शरीरावर अनेक सुंदर डिझाईनचे टॅटू काढून घेतले. पण पहिल्या टॅटूचा हा किस्सा त्याला नेहमी लक्षात राहिला. धवनच्या हातावर अर्जुन, शिव, फुल, पक्षी असे अनेक टॅटू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.