मुंबई, 21 एप्रिल- शिळं अन्न शरीरासाठी घातक असतं, असं म्हणतात. शिळ्या अन्नामध्ये हानिकारक जिवाणूंची निर्मिती होऊन त्यामुळे शरीराला अपाय होऊ शकतो; मात्र काही विशिष्ट वेळी शिळं अन्न खाल्ल्यास शरीरासाठी ते उपयुक्तही ठरू शकतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. असं असलं तरी उन्हाळ्यात शिळं अन्न खाण्याने त्रास उद्भवू शकतो, असंही तज्ज्ञ सांगतात.
पोळी (चपाती) खायला आवडते, म्हणून पोळ्या जास्त केल्या जातात व त्या उरतात. काही जण तर 2 दिवसांच्या पोळ्या करून फ्रीजमध्ये ठेवतात. मग या पोळ्या गरम करून पुढचे दोन दिवस खाल्ल्या जातात. अशा प्रकारे शिळ्या पोळ्या खाल्ल्याचे काय फायदे-तोटे आहेत, हे तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
कसा असेल 21 एप्रिलचा दिवस? एखाद्या अनपेक्षित कॉलमुळे दिवस चांगला जाईल
आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटलचे (प्रशांत विहार, दिल्ली) मेडिकल सुपरिटेंडंट आणि मानसोपचार व आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. आर. पी. पाराशर यांच्या मते, उन्हाळ्यात शिळं अन्न खाऊ नये. शिळ्या पोळीच्या सेवनाचे काही फायदे आणि काही तोटेही असू शकतात. सकाळी शिळी पोळी खाल्ली तर त्यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो; मात्र उन्हाळ्यात शिळी पोळी खाल्ली तर त्रास होऊ शकतो. कारण जास्त तापमानात पोळीमध्ये हानिकारक जिवाणू किंवा बुरशी तयार होऊ शकते.
अन्न शिजवून जास्त काळ झाल्यावर ते खराब होऊ शकतं. काही पदार्थ सामान्य तापमानातही खराब होतात. त्यामुळे शक्यतो अन्न शिजवल्यावर लगेचच खावं. गव्हाच्या पोळ्या फायबरयुक्त असतात. त्यामुळे पचनशक्ती सुधारते. कोंडायुक्त पीठ असल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
शिळी पोळी खाण्याचे तोटे
आरोग्याच्या दृष्टीने शिळं अन्न खाणं योग्य नाही. विशेषतः उन्हाळ्यात दोन-तीन दिवसांपूर्वी तयार झालेलं अन्न खाणं चांगलं नसतं. जास्तीचे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून पुढचे 2-3 दिवस खाणंही शरीरासाठी हानीकारक ठरू शकतं, असं डॉ. पाराशर यांचं म्हणणं आहे.
शिळं अन्न टाकून देण्यापेक्षा त्याचा सदुपयोग करणं केव्हाही उत्तम, मात्र तसं करताना आपल्याला किंवा इतरांना अपाय होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. रात्री केलेल्या पोळ्या दुसऱ्या दिवशी सकाळी खाता येतात. मात्र अपचनासारख्या समस्या असणाऱ्यांनी तसं करू नये. उन्हाळ्यात सकाळी तयार केलेल्या पोळ्याही सामान्य तापमानात संध्याकाळपर्यंत खराब होऊ शकतात. त्यामुळे पोटदुखी, उलटी होऊ शकते. 2-3 दिवसांच्या शिळ्या पोळ्या खाल्ल्या तर अन्नातून विषबाधा होऊ शकते. यामुळे पचनक्रिया खराब होऊ शकते.
शिळ्या पोळ्या खाण्याचे काही फायदे असले, तरी शिळं अन्न आरोग्यासाठी घातकच असतं. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत अन्नपदार्थ लवकर खराब होतात. त्यामुळे या दिवसांत शक्यतो शिळ्या पोळ्यांचं सेवन करू नये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.