मुंबई, 29 एप्रिल : आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी शिळं अन्न खाणं टाळलं जातं; मात्र शिळ्या पोळ्या खाण्याचे काही फायदेही आहेत. ब्लड प्रेशरपासून डायबेटीसपर्यंतच्या आरोग्यविषयक समस्यांमध्ये शिळ्या पोळीचं सेवन उपयुक्त असतं, असं म्हटलं जातं. ‘नवभारत टाइम्स’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
सकाळी नाश्ता करताना काही जण शिळी पोळी खातात. अनेक जण शिळ्या पोळ्या फेकून देतात किंवा एखाद्या प्राण्याला खाऊ घालतात. कारण शिळी पोळी खाल्यामुळे आरोग्य बिघडू शकते; मात्र शिळी पोळी मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते.
नोएडा इथल्या ‘कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिक’चे संचालक डॉ. कपिल त्यागी यांनी सांगितलं की, ‘मधुमेह आणि पचनक्रियेसाठी शिळी पोळी खाणं हा एक चांगला पर्याय आहे. नाश्त्यात दूध किंवा भाज्यांसोबत शिळी पोळी खाल्ल्यास मधुमेहावर नियंत्रण ठेवता येतं. साधारपणे 12 ते 15 तासांपूर्वीची शिळी पोळी खावी.’
12 तास हवेच्या संपर्कात राहिल्यानंतर, पोळीची चव, आकार आणि स्टार्च रचनेत बदल होतो. स्टार्च हे एक प्रतिरोधक फायबर म्हणून कार्य करतं आणि त्वरित ग्लुकोजमध्ये रूपांतरित होत नाही. ताजी आणि शिळी पोळी यांच्या ग्लायसेमिक इंडेक्समध्येही मोठा फरक आहे. सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे शिळ्या पोळीचा रक्तातल्या साखरेच्या पातळीवर फारसा परिणाम होत नाही.
डायबेटिसच्या रुग्णांनी वजन कमी केल्यास होतात `हे` फायदे
शरीराचं सामान्य तापमान 37 अंश सेल्सिअस असतं. ते 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर ते शरीराला हानी पोहोचवू शकतं. थंड दुधात भिजवलेल्या शिळ्या पोळ्या खाल्ल्यानं शरीराचं तापमान नियंत्रित राहतं. शिळी पोळी आणि दुधाच्या मिश्रणातून भरपूर पोषक तत्त्वं मिळतात. त्यामुळे अॅसिडिटीपासूनसुद्धा बचाव होतो.
हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी शिळी पोळी थंड दुधासोबत खाणं उपयुक्त आहे. शिळी पोळी थंड दुधात भिजवा आणि 10 मिनिटं राहू द्या. सकाळच्या नाश्त्याला ती खा. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत होऊ शकते.
हाय ब्लड शुगरचा त्रास असणाऱ्यांनी शिळी पोळी थंड दुधात भिजवून 10-15 मिनिटं ठेवावी. त्यानंतर ती दिवसभरात कोणत्याही वेळी सेवन करू शकता.
शिळी पोळी पोटासाठी चांगली असते. ज्यांना वारंवार पोटाचा त्रास होतो, त्यांच्यासाठी शिळी पोळी हा उत्तम घरगुती उपाय आहे. झोपण्यापूर्वी थंड दुधात भिजवलेली शिळी पोळी खाल्ल्यास बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि गॅससारख्या पोटाच्या समस्या दूर होतात. यामध्ये असलेले फायबर्स बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.